श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत भोजन, नास्ता, दूध, अंडी व ऋतुमानानुसार फळे पुरविण्याची जबाबदारी ब्रिक्स इंडिया लिमिटेड पुणे या खासगी कंपनीची आहे. परंतु या कंपनीचा कुणीही जबाबदार व्यक्ती इथे कार्यरत नसल्याने ती जबाबदारी मुख्याध्यापक यांचेवर येऊन पडली आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचा प्रत्यय येतो आहे.


अनुसूचित जाती मुलीच्या या शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत. त्यात १८० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या निवासी शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर असे एकूण १९ पदे मान्य आहेत. त्यापैकी ६ शिक्षक व ३ शिक्षकेत्तर कर्मचारीच आज कार्यरत असून तब्बल १० पदे रिक्त आहेत. त्यात ३ माध्यमिक व ३ प्राथमिक या शिक्षकांचा समावेश असल्याने विद्यार्थिनींचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. अधीक्षक १, वरिष्ठ लिपिक १ व ३ सिपाई अशी पदे रिक्त असल्याने त्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.


पुण्याच्या ब्रिक्स इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीवर दोन्ही वेळेचे भोजन, नास्ता, दूध, अंडी व भाजीपाला पुरविण्याची जबाबदारी आहे. परंतु या कंपनीचा कुणीही जबाबदार व्यक्ती इथे कार्यरत नसल्याने रोजनदारीवरील महिलांच्या माध्यमातून ती जबाबदारी मुख्याध्यापक पार पाडत आहेत .या शाळेत किमान ३० लिटर दुधाची गरज असतांना तिथे फक्त ७ लिटर एवढेच दूध खरेदी केले जात असल्याने १८० विद्यार्थिनींना ठरल्यानुसार दूध पुरवठा होतो किंवा नाही हा संशोधनाचा भाग आहे. तसेच ऋतुमानानुसार उपलब्ध फळे पुरविणे अनिवार्य असतांना केवळ एकच कॅरेट केळी दिसून आल्याने व भाजीपाला, दूध,अंडी व फळांची बिले उपलब्ध नसल्याने तसेच पिण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केल्याने मुलींचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी अशोक ज्ञानबा ढाकणे यांची प्रतिनियुक्ती बदनापूर येथे केली असून दिवाळीनंतर विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी झाली नाही.तसेच भोजन, नास्ता आदी बाबींची तपासणी मी चव चाखून करतो. अशी माहिती मुख्याध्यापक एस.आर. जोशी यांनी दिली.
