हिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अलीकडील भेटीनंतर हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड डिव्हिजनचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले (DRM Pradeep Kamle’s surprise inspection) यांनी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह हिमायतनगर रेल्वे स्थानकावर अचानक भेट देऊन पाहणी केली.


अमृत संवाद योजनेअंतर्गत त्यांनी थेट प्रवाशांशी व शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणींचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे स्थानकावरील कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला कडक सूचना देण्यात आल्या.


दोन वर्षांपासून काम संथगतीने
हिमायतनगर स्थानकाच्या कायापालटासाठी अमृत भारत योजनेतून ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, गेली दोन वर्षे काम सुरू आहे. मात्र कामाची गती अत्यंत संथ असून निकृष्ट दर्जाचे साहित्य, सुरक्षा उपायांचा अभाव आणि ठेकेदाराची हलगर्जीपणा याबाबत नागरिकांनी पूर्वीही आवाज उठवला होता. दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी भेट देऊन कामातील उणीवा उघड केल्या होत्या. त्यानंतर डीआरएम यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.



नागरिकांनी मांडल्या या प्रमुख समस्या
पाण्याची टंचाई व स्वच्छतेचा अभाव, पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी, वरिष्ठ नागरिक सवलत (Senior Citizen Concession) पुन्हा सुरू करावी, जनरल सुलभ शौचालय, वेटिंग हॉल आणि पार्किंगची समस्या, अलाऊन्सिंग व पोलीस चौकीची गरज, डबल ट्रॅक प्रकल्प गतीने सुरू करणे, धनबाद एक्स्प्रेसला थांबा, तपोवन एक्स्प्रेस आदिलाबादपर्यंत वाढविणे, गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी, श्री परमेश्वर मंदिराची मूर्ती स्वागत कमानीवर लावणे, अंडरब्रिज व ओव्हरब्रिज खड्डेमय झाल्याने प्रवाश्याना येणारी अडचण सोडवून प्रकल्पांना गती देणे आदी मागण्या करण्यात आल्या.


काम पूर्णतेला वेग — डिसेंबरमध्ये लोकार्पण
डीआरएम कामले यांनी सर्व तक्रारी व मागण्या ऐकून घेत “अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण काम करणे बंधनकारक आहे” असे ठेकेदाराला बजावले. तसेच उर्वरित कामांना वेग देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे लोकार्पण येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली. या भेटीत गौतम पिंचा, गणेश शिंदे, अनिल मादसवार, रामभाऊ शिंदे, वामनराव पाटील वडगावकर, साईनाथ कोमावार, प्रकाश जाधव, प्रवीण कोमावार, गौरव सूर्यवंशी, अमोल धुमाळे, प्रकाश सेवनकर, सोपान बोंपीलवार, धम्मपाल मुनेश्वर, उत्कर्ष मादसवार यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवाशी नागरिक उपस्थित होते.

डीआरएम कामले यांचे आश्वासन
“आपण मांडलेल्या समस्या व सूचना गांभीर्याने घेतल्या आहेत. अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. डिसेंबरमध्ये लोकार्पणाचे लक्ष्य ठेवले आहे.” या निर्णयामुळे हिमायतनगर रेल्वे स्थानकावर दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे. संपूर्ण काम पूर्ण झाल्यास हिमायतनगर रेल्वे स्थानक आधुनिक सुविधांनी सज्ज होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
