नांदेड| धनगर टाकळी केंद्राअंतर्गत येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा) ता. पूर्णा जि. परभणी येथे गेल्या पाच वर्षापासून दीपावली सुट्टीत बौद्धिक फराळ वाटप केला जातो. सदर उपक्रमात पायाभूत साक्षरतेची पार्श्वभूमी समाविष्ठ असलेले उतारा वाचन व त्यावरील अध्ययन निष्पत्तीवर आधारीत जसे प्रश्नोतरे, शब्दकोडी, शुद्ध शब्दाला गोल करणे, गटात न बसणारा शब्द ओळखून त्याला गोल करणे, शाब्दीक सापशिडी, शब्दांचा डोंगर तयार करणे.


त्याचबरोबर संख्या लेखन अक्षरात अंकात, संख्यावर आधारीत सर्वांत लहान अंकी संख्या तयार करणे, सर्वांत मोठी संख्या तयार करणे, हातच्याच्या बेरजा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठांतर, विस्तारीत रूपावरून संख्या ओळखून लिहिणे, स्थानिक किंमत ओळखणे, वर्गमुळ, घनमुळ, पाठांतर करणे इंग्रजीतील शब्दकोष तयार करणे. उदा. ए पासून दहा शब्द ते झेडपर्यंत प्रत्येकी दहा शब्द संकलीत करणे, शब्द कोडी सोडवणे, शब्दांची बाग तयार करून त्यातून विविध प्रकारचे शब्द शोधणे, इंग्रजी राईम्स पाठ करणे, ग्रामपंचायतीची स्थापना ते सरपंच, ग्रामसेवक यांचे अधिकार आणि जबाबदार्या यावर मुलाखती घेवून प्रकल्प तयार करणे आदी बाबी सदर उपक्रमाच्या अंतर्गत येतात. दिवाळी च्या फराळाचा आस्वाद घेता घेता अभ्यासामध्ये खंड पडून विस्मरण होवू नये म्हणून किमान अध्ययन निष्पतीवर आधारीत वर्गनिहाय दिपावली बौद्धीक फराळ सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकरिता वाटप केला जातो.

याबरोबरच मूल्यसंस्कार करायचे नसतात तर ते विद्यार्थामध्ये रूजवली पाहिजेत या तत्वानुसार महापुरुषांचे चरित्र, सुविचार संग्रह, इसापनीतीच्या गोष्टी, बालकथा संग्रह, चित्र रंगभरण, बडबड गीते, सामान्य ज्ञानाची पुस्तके, सर्वधर्म समभाव व्यक्त करणार्या गोष्टी, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व बौद्धिक क्षमता लक्षात घेवून पुरक वाचन साहित्याचा देखिल बौध्दीक फराळात समावेश केला जातो. सदर उपक्रमाचे सुट्ट्या संपल्यानंतर मूल्यांकन करून सर्वाधिक सुंदर सादरीकरण करणार्या विद्यार्थ्यास ग्रंथरूपी भेट देवून यथोचित मानसन्मान केला जातो.

सदर उपक्रमाचे कौतुक केंद्रप्रमुख उमाकांत देशटवार, शालेय व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष प्रभाकर मोरे, मुख्याध्यापक विठ्ठल रिठठे, ज्ञानोबा विटकर, संजय कदम, संगिता भोळे, त्र्यंबक उदबुके, तिरुपती केंद्रे, शंकर मेंगावार आदीनी केले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेल्या पाच वर्षापासून उपक्रमाचे संयोजन करणारे उपक्रमशील शिक्षक मारोती कदम यांनी स्वतःचा ग्रंथसाठा आणि पुरक वाचनाचे साहित्य उपलब्ध करून दिले.

सदर उपक्रमामुळे विद्यार्थी अभ्यापासून दुर जात नाहीत. मोबाइलच्या व्यसनापासून काही प्रमाणात सुटका होते. विद्यार्थी कार्यमग्न राहतात. अभ्यासाचे विस्मरण होत नाही. -मारोती कदम (उपक्रमशील शिक्षक) बौध्दीक फराळ या उपक्रमामुळे सुट्टीतील आमचा वेळ वाया जात नाही. शब्दकोडी, चित्र रंगभरण मुळे आम्हाला नवनविन चित्रे रंगभरण्याची संधी मिळते. सुट्टीतील अभ्यामुळे पुस्तकांसोबतची मैत्री वाढते. सामान्य ज्ञानात भर पडते. – श्रावणी चव्हाण (वर्ग तिसरा).