नांदेड l 21- नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने डिजिटल मित्र पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह विविध विभागांच्या योजना आणि सेवा नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना घरी बसून शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि शासनावरील नागरिकांचा विश्वास वाढणार आहे. योजनांबाबत माहिती व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात पाहता येणार आहेत. या पोर्टलवर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून तक्रारी, मागण्या व निवेदन सादर करण्याची सोयही या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती 48 तासांत ऑनलाईन तपासता येईल.
शेतकऱ्यांसाठी ड्रोनसंबंधी अर्ज व माहिती, तसेच प्रशासन विभागातील ज्येष्ठता यादी व जीपीएफ यांसारख्या सेवा देखील या पोर्टलवर उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.


नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप सुविधा
7020522798 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून सर्व नागरिकांना या पोर्टलशी संबंधित सेवा उपलब्ध राहतील. जिल्हा परिषदेने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिकारी भेट व वेळ ऑनलाईन
पोर्टलवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभाग प्रमुखांच्या भेटीची वेळ निश्चित करता येईल. त्यामुळे बैठका वा दौऱ्यांमुळे प्रत्यक्ष भेट न मिळाल्यास नागरिकांचा वेळ वाचणार असून नियोजित पद्धतीने प्रत्यक्ष भेटी होणार आहेत. नागरिक या पोर्टलवर आताही आपल्या सोयीनुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नागरिकांना भेटीची वेळ 25 ऑगस्ट पासून देण्यात येणार आहे.


पालकमंत्र्यांनी केले कौतुक
या पोर्टलचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद नांदेडने सुरू केलेला हा उपक्रम नाविन्यपूर्ण, पारदर्शक, वेळेची बचत करणारा आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढवणारा आहे, असे गौरवोद्गार काढत पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.


