हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहरातील “बजरंग चौकचा राजा” नवं प्रशांत गणेश मंडळाकडून मागील ६५ वर्षांपासून धार्मिक सलोखा जपत परंपरेने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासत हा उत्सव दरवर्षी युवा मंडळींच्या पुढाकाराने पार पडतो.


यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळ-सायंकाळी दररोज महाआरती, प्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असून लहान-थोरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सव अधिकच मंगलमय झाला आहे.


मुंबईच्या धर्तीवर सजवलेली “गरुडावर आरूढ गणपती बाप्पाची भव्य व मनमोहक मूर्ती” भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणून मंडळाने ख्याती मिळवली आहे. दरवर्षी प्रथम क्रमांक पटकाविण्याची परंपरा यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करून मंडळातील युवकांनी मोठा दावा केला आहे.



स्थापना ठिकाणी एखाद्या राजवाड्यासारखी दिव्य सजावट करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी परिसर मंगलमय वातावरणाने उजळून निघतो आहे. यंदा मंडळाकडून पर्यावरणपूरकता व स्वदेशीचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आगामी अनंत चतुर्थीच्या विसर्जन सोहळ्याबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, बजरंग चौकात दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे. जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी व त्याचे सहकारी उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

