किनवट परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदी केंद्राचा लाभ मिळावा व शेतकऱ्यांना शासन दर मिळावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या मागणीनंतर आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्वारी खरेदी केंद्राला किनवट तालुक्यातील इस्लापूर या ठिकाणी मंजुरी मिळाली. पण ज्वारी खरेदी ही संत गतीने चालू असल्या कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सदरील केंद्राची खरेदीची मुदत ही 30 जून रोजी संपणार असून या मुदतीस एक महिन्यासाठी वाढ मिळावी अशा स्वरूपाची मागणी इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नागेश पाटील यांच्याकडे केली. शेतकऱ्याची हित लक्षात घेऊन सदरील खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळवण्यासाठी शासन दरबारी वजन खर्ची करेल अशी ग्वाही याप्रसंगी खासदार नागेश पाटील यांनी दिली. सदरील खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदी करण्यासाठी 735 लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली असून त्यापैकी फक्त 130 शेतकऱ्यांचीच ज्वारी या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत खरेदी करण्यात आलेली आहे.


जवळपास आठ हजार क्विंटल ज्वारीची आतापर्यंत खरेदी झाली असून 60 टक्के शेतकरी ही आजही या लाभापासून वंचित आहेत त्यातच या खरेदी केंद्रावर सावकाराच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येक्षात ज्वारीचा पेरा नसताना सातबारावर मात्र ज्वारीच्या नोंदी करून काही खरेदी होत असल्याची ओरड सुद्धा शेतकऱ्याच्या माध्यमातून ऐकवायचं मिळत आहे. सदरील ज्वारी खरेदी केंद्रास माल साठवण्यासाठी गोदाम अपुरे पडत आहे.



त्या कारणामुळे इस्लापूर येथील खरेदी आज घडीला किनवट येथील वखाड महामंडळाच्या गोदामातून होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वाहनाचे दुप्पट भाडे सोसावे लागत आहे. अशा प्रकारास इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी पाटील घोगरे यांनी आळा घालावा अशा स्वरूपाची मागणी आता शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. संत गतीने चालू असलेल्या या खरेदीस चालना मिळावी व व्यापाऱ्याची घुसखोरी थांबावी व खऱ्या शेतकऱ्यांना या खरेदी योजनेचा लाभ मिळावा अशा स्वरूपाची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.



