लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून ती एक सुसंस्कृत, जबाबदार आणि संवेदनशील सामाजिक व्यवस्था आहे. ही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम करण्यासाठी तिचे चारही आधारस्तंभ भक्कम, निस्पृह आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे वृत्तपत्र व माध्यमे—हे चारही स्तंभ एकमेकांना पूरक ठरून लोकशाहीला स्थैर्य देतात. परंतु आज प्रश्न असा निर्माण होतो की, हे आधारस्तंभ खरोखरच मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? आणि नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची?


लोकशाही मजबूत करण्यासाठी तिच्या मुळाशी असलेले मूल्यसंवर्धन महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने शासन, संस्था, संघटना आणि समाजातील नेतृत्व करणारे घटक यांनी तटस्थपणे, दूरदृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र वास्तव पाहता, विशेषतः चौथ्या आधारस्तंभाबाबत हे प्रयत्न अपुरे, विस्कळीत आणि अनेकदा स्वार्थप्रधान दिसून येतात.

वृत्तपत्र : चौथा आधारस्तंभ की सत्तेचा प्रतिध्वनी? वृत्तपत्रे आणि माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते. कारण ही माध्यमे सत्तेवर अंकुश ठेवतात, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतात आणि सत्य, वस्तुनिष्ठ माहिती समाजासमोर मांडण्याचे काम करतात. मात्र आज या आधारस्तंभावर नियुक्त होणाऱ्या प्रतिनिधींच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार झाला आहे का, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.


वृत्तपत्र प्रतिनिधीची शैक्षणिक पात्रता, त्याची सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्यांची समज, लिखाणाचे कौशल्य, विचारांची स्पष्टता आणि समतोल दृष्टिकोन—या सर्व बाबी कितपत तपासल्या जातात? केवळ ओळखी, राजकीय जवळीक किंवा तात्कालिक फायद्यांच्या आधारे प्रतिनिधी नेमले जात असतील, तर त्या माध्यमांकडून लोकशाहीस पूरक भूमिका अपेक्षित ठेवणे कितपत योग्य ठरेल?

प्रशिक्षण, परीक्षण आणि तटस्थतेचा अभाव – आजच्या काळात द्वेषमुक्त, तटस्थ, वास्तववादी आणि जबाबदार पत्रकार घडवण्यासाठी कोणती प्रभावी यंत्रणा अस्तित्वात आहे? लिखित शब्द, छायाचित्र, ध्वनी-चित्र या सर्व माध्यमांतून सत्य मांडताना संवेदनशीलता, संयम आणि देशप्रेम यांचा समतोल राखण्याचे प्रशिक्षण दिले जाते का? यासाठी स्वतंत्र, स्वायत्त आणि निष्पक्ष यंत्रणा निर्माण करण्याचा गंभीर विचार झाला आहे का?
जर अशी कोणतीही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसेल, तर चौथा आधारस्तंभ मजबूत आहे, तो खेळखिळा झालेला नाही, असे आपण ठामपणे कसे म्हणू शकतो? माध्यमांचा अविवेकी वापर, अतिरंजित मांडणी, अपूर्ण माहितीवर आधारित निष्कर्ष आणि द्वेषमूलक भाषाशैली यामुळे समाजात गोंधळ, अविश्वास आणि तणाव वाढत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते.
शासन, राजकारण आणि ‘सर्व वैद्य मरो ऐसे’ भूमिका – दुर्दैवाने, शासनाला किंवा सत्ताधाऱ्यांना चौथा आधारस्तंभ अधिक सक्षम, सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यापेक्षा त्यावर प्रतिक्रिया देण्यात, त्याच्याशी संघर्ष करण्यात किंवा सोयीस्कर भूमिका घेण्यात अधिक रस असल्याचे जाणवते. सत्ताधारी असोत वा विरोधक, बहुतांश वेळा “सर्व वैद्य मरो ऐसे” अशी भूमिका घेतली जाते. म्हणजेच माध्यमांवर दोष ढकलणे, त्यांना बदनाम करणे किंवा त्यांचा वापर आपल्या सोयीसाठी करणे—यापलीकडे व्यापक सुधारणांचा विचार होताना दिसत नाही.
संघटना आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वांची अपयशाची कबुली – वर्तमानपत्र क्षेत्रात भव्य-दिव्य कार्य केल्याचा दावा करणाऱ्या विविध संघटना आणि त्यातील दिग्गज व्यक्तिमत्वांनाही या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल. पत्रकारितेच्या दर्जात्मक उन्नतीसाठी, दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी आणि विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेले सखोल काम अद्याप अपेक्षित पातळीवर झालेले नाही.
विश्वासार्हतेचा ऱ्हास आणि पुढील वाटचाल – आज माध्यमांबाबत समाजात निर्माण झालेली विश्वासहर्ता ही गंभीर बाब आहे. ही परिस्थिती कायम राहिली, तर उरलेली थोडीबहुत विश्वासार्हताही टिकवणे कठीण होऊन जाईल. म्हणूनच आता आत्मपरीक्षणाची, आत्मशुद्धीची आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे.
शासन, माध्यमसंस्था, पत्रकार संघटना, प्रशिक्षण संस्था आणि समाजातील जागरूक घटक—सर्वांनी मिळून चौथा आधारस्तंभ अधिक सक्षम, तटस्थ, वास्तववादी आणि लोकशाहीपूरक बनवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ टीका किंवा आरोप न करता, रचनात्मक उपाययोजना, प्रभावी प्रशिक्षण व्यवस्था आणि स्पष्ट नैतिक चौकट उभी करणे ही काळाची गरज आहे.
लोकशाही टिकवायची असेल, तर तिच्या आधारस्तंभांवर केवळ भाष्य करून चालणार नाही, तर त्यांना मजबूत करण्यासाठी प्रामाणिक कृती करावी लागेल. चौथा आधारस्तंभ हा लोकशाहीचा आरसा आहे. हा आरसा धूसर झाला, तर समाजालाच स्वतःचे खरे प्रतिबिंब दिसणार नाही. म्हणूनच उरलेली विश्वासार्हता वाचवण्यासाठी आणि लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी सर्व यंत्रणा आणि समाजधुरीणांनी एकत्रितपणे, गांभीर्याने पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे.
लेखक– गोविंद मुंडकर, ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक नगर, नांदेड

