नांदेड| आजच्या युगात पदवी पेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व आहे. त्यामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी संबंधित उद्योग जगतात प्रत्यक्षात प्रशिक्षण घेतले तर कित्येक पटीने चांगले. एईडीपी (व्यावसायाधिष्ठित पदवी अभ्यासक्रम) या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच कौशल्य आधारित पिढी घडविणे असा आहे. त्यामुळे निश्चितच एईडीपी अंतर्गत घेतलेली पदवी म्हणजे उज्वल असे भविष्य आहे, असे मत कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.


ते आज दि.४ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील आधीसभा सभागृहात एईडीपी अंतर्गत सुरू केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोपात बोलत होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, राज्य एईडीपी समितीचे अध्यक्ष डॉ भारत अमाळकर, एईडीपी पश्चिम विभाग, मुंबईचे सहाय्यक आयुक्त डॉ.प्रवीण ऊके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. संगीता माकोणे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर आणि उद्योजक सी ए हर्षद शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे कुलगुरु डॉ. चासकर म्हणाले की, स्वामी रामानंद विद्यापीठ हे एईडीपी अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. शिक्षण घेत घेत प्रशिक्षण अशी छोटीशी व्याख्या या कार्यक्रमाची आहे. प्रमुख पाहुणे डॉ.प्रवीण ऊके आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, एईडीपी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना पारंपारिक पदवीशिवाय कौशल्य आधारित पदवी घेऊन स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल हे शिकवले जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या कार्यक्रमांतर्गत उद्योगाला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे स्टायपेंड दिले जाणार आहे. त्यातील ५० टक्के वाटा हा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे.


जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माहेश्वरी म्हणाले, एईडीपी अंतर्गत पदवी घेताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे नोकरी करताना किंवा स्वतःचा उद्योग उभारताना वेगळे प्रेक्षण घेण्याची गरज पडणार नाही.

डॉ.भारत अमाळकर म्हणाले, जर आपण असेच पारंपारिक शिक्षण देत राहिलो तर येणाऱ्या वीस-पंचवीस वर्षात हे महाविद्यालए व विद्यापीठे ओस पडतील. उद्योग जगतात कामगार मिळणार नाही मिळत म्हणून अडचण आहे. तर पदवीधारक विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते बेकार आहेत. या दोन्ही मधला दुवा म्हणजे एईडीपी अंतर्गत मिळणारी पदवी.
सर्वप्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम सुरु करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजनाथ अनामुलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.शैलेश वाढेर यांनी केले. याप्रसंगी जैवतंत्रशास्त्र संकुलाचे संचालक डॉ.बी.एस.सुरवसे, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ.गिरीश चौधरी, डॉ.एल.एस.कांबळे, डॉ.अविनाश पुयड, डॉ. अर्चना साबळे यांच्यासह संकुलातील प्राध्यापक, एईडीपी अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

