हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सोनारी फाटा ते हदगाव जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जवळगाव परिसरातील रेल्वे अंडरब्रिजखाली उभे असलेले लोखंडी मोठे खांब कधीही कोसळण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.याकडे रेल्वे विभागाने लक्ष देऊन संभाव्य धोका टाळवा अशी मागणी होत आहे.


हिमायतनगर – हदगांव या मार्गावरून दररोज वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र या रस्त्यात जवळगांव नजीक असलेल्या रेल्वे अंडर ब्रिजच्या खड्डेमय रस्त्याची आणि लोखंडी खंबाची परिस्थितीत अत्यंत धोकादायक झाली आहे. हे खांब एखाद्या वाहनावर किंवा पादचाऱ्यावर कोसळल्यास मोठी जिवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.

अपघात होण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी व संभाव्य धोका दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीदत्त पाटील पवार (सोनारीकर) यांनी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या धोकादायक खांबांची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती अथवा हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांतूनही जोर धरू लागली आहे.


