हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीचा सोहळा अवघ्या दारात आला असून, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. पूजासाहित्य, वही-खाते, रोजनामा लिहिण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे तसेच विविध दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ गर्दी दिसून आली.


दिवाळी हा सर्वसामान्यांसाठी मोठा सण असल्याने कपडे, पूजेसाठी लागणारे साहित्य, दिवे, आकाश कंदील, सजावटीचे साहित्य, नाते गुंफणारे करदोडे, उटणे, मिठाई यांसह इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीला बाजारपेठेत जोरदार सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सवलती व ऑफर्स दिल्याने खरेदीचा उत्साह अधिक वाढला आहे.


सणासुदीच्या वातावरणात बाजारपेठ उजळून निघाल्याने व्यापाराला चालना मिळत असून नागरिक दिवाळीच्या स्वागताची उत्साहाने तयारी करत आहेत. मात्र यंदा अतिवृष्टीच्या सावटामुळे काही प्रमाणात निराशा असली तरी लेकीबाळीचा हा उत्सव असल्याने शेतीतून आलेल्या उत्पन्नावर शेतकरी दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, शासनाकडून मंजूर झालेली अतिवृष्टीची मदत अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.



धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला दिवस असून, याला “धनतेरस” असेही म्हणतात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात आणि या दिवशी आरोग्य, संपत्ती व समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी सोने-चांदी, भांडी, पूजासाहित्य, नवीन वही-खाते, रोजनामा इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. घरात दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत करण्याची परंपरा आहे. व्यापारी वर्ग या दिवशी नवीन वर्षाचे लेखाजोखा सुरू करतात. आरोग्य आणि धन लाभासाठी विशेष पूजा केली जाते.


संध्याकाळी घरासमोर रांगोळी काढून दिवे लावले जातात. धन्वंतरी देवतेची व धनलक्ष्मीची पूजा करून आरोग्य, समृद्धी व आनंदाची कामना केली जाते. काही ठिकाणी याच दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये लक्ष्मीचे स्थायिकत्व होते. त्यामुळे बाजारपेठा या दिवशी सर्वाधिक फुलतात.


