नांदेड| भारत सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत.
शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा URL www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करावयाच्या कार्यवाहीचे सादरीकरण दिले आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेतकरी माहिती संच निर्माण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र राज्याचा शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी स्वयं नोंदणी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल व शेतकरी माहिती संचात समाविष्ट करता येणार आहे.