हिमायतनगर| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीटू आणि लोकविकास संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी हिमायतनगर नगरपंचायत येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी देशभर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलने केली जातात. स्थानिक आणि प्रलंबीत मागण्याची पूर्तता करावी म्हणून ऐन नाग पंचमीच्या दिवशी सनासुदीत शेकडो महिला आक्रमकपणे नगर पंचायत मध्ये घुसल्या.
जॉब कार्ड,घरकुल,रेशन कार्ड देण्यात यावे.मनरेगाची कामे शहरात सुरु करावीत.मागील २० ते २५ वर्षांपासून घरे बांधून शहरात राहतात त्यांना मालकी देण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रणदिवे यांना देण्यात आले होते. पुढील दहा दिवसात जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगर पंचायतच्या वतीने दिले आहे. दहा दिवसात आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर न्यायालयात ओढणार आणि दाद मागणार असा इशारा जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांनी क्रांती दिनी दिला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष कॉ.दिगंबर काळे, जयश्री बीजेवार,गणेश रचेवार आदींनी प्रयत्न केले तर किसान सभेचे नेते कॉ. अर्जुन आडे, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, बांधकाम संघटनेचे अध्यक्ष कॉ.दिलीप पोतरे आदींनी पाठिंबा देत आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी परमेश्वर मंदिर परिसरातून मोर्चा काढून नगर पंचायत येथे चार तास घेराव घालून जोशपूर्ण घोषणाबाजी करण्यात आली. अशी माहिती सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.