नांदेड| नांदेड येथील पवित्र सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा दर्शनसाठी व बिदर येथील यात्रेसाठी देश-विदेशातून लाखो भाविक प्रवास करतात, यात्रेकरूंची ही यात्रा आनंददायी व आरामदायी तसेच अधिक गतीमान व्हावी यासाठी गुरु गोविंदसिंघजींच्या नांदेडला गुरु नानक देव जींच्या बीदरला रेल्वे मार्गाने जोडणे अधिक गरजेचे आहे, असे मत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी विभागीय रेल्वे महानिरिक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केले.


नांदेड रेल्वे महानिरिक्षकांच्या विभागीय रेल्वे कार्यालयात संसद सदस्य व वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांची वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी प्रवाशांशी संबंधित विविध रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. खा.अजित गोपछडे म्हणाले, प्रस्तावित नांदेड-बिदर रेल्वे मार्ग प्रकल्पात महाराष्ट्र सरकार आपला 50% वाटा देण्यास तयार आहे, परंतु कर्नाटक सरकार अद्याप आपला वाटा उचलण्यास तयार नाही. याबाबत कर्नाटक सरकारची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी या प्रल्पाचे काम रखडले आहे.अशा अनेक समस्या आहेत, हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी काही मार्ग काढण्याची विनंती आपण केंद्र सरकारकडे करणार आहोत. हा रेल्वे मार्ग तात्काळ सुरु व्हावा अशी नांदेड विभागातील सर्व प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची एकमुखी मागणी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशातील भारतीय पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे, त्यामुळे देशाच्या विकासात पर्यटन क्षेत्राचे मोठे योगदान मिळत आहे. त्यापैकीच नांदेड एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून त्यासाठी नांदेड-पुणे-कोल्हापूर, नांदेड-तिरुपती रॉयनसिमा एक्सप्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत व्हावा अथवा नवी रेल्वे सुरु करावी, काशी, अयोध्या, गोरखपूर, आसामच्या धुबरी साहिब गुरु तेगबहाद्दर स्थळापासून उत्तरपूर्व भारतातील तीनसुकियापर्यंत नांदेडहून थेट रेल्वे सेवा सुरु करणे आवश्यक आहे. नांदेडहून हैद्राबाद, पुणे, नागपूरसाठी वंदेभारत एक्सप्रेस सुरु करावी, अशीही मागणी खा.अजित गोपछडे यांनी केली.

कोविड काळात बंद झालेली सामान्य प्रवासी तथा शेतकर्यांची गाडी म्हणून ओळखली जाणारी मुदखेड -रोटेगाव सवारी गाडी पुर्ववत सुरु करावी, ही खा.डॉ.अजित गोपछडे यांची मागणी रेल्वे प्रशासनाने याच बैठकीत मान्य केली.याशिवाय नगरसोल एक्सप्रेसला उमरी स्थानकावर थांबा द्यावा या मागणीसाठी पार्सल विभागातील कर्मचार्यांच्या अनेक कल्याणकारी मागण्याही मांडल्या. किनवट, हिमायतनगर, भोकर परिसरातील नागरिकांनी नांदेड-पुणे एक्सप्रेसला बल्लारशहा स्थानकापर्यंत वाढविण्याबाबत केलेल्या मागणीचे निवेदनही यावेळी रेल्वे महानिरिक्षकांकडे सोपविण्यात आले.

बोधन-बिलोली-मुखेड-लातुर रोड रेल्वे मार्ग प्रकल्प सुरु करण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी,रेलवे मध्ये तथा रेलवे स्थानकावर महिला स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून नाश्ता व भोजन व्यवस्था व्हावी यासाठी एक योजना तयार केल्यास प्रवाशांचे आरोग्य चांगले राहील तसेच सामान्य लोकांना रोजगारही उपलब्ध होतील, या विभागात ही योजना यशस्वी ठरल्यास संपूर्ण भारतात या योजेचा विस्तार करता येईल, असेही डॉ.गोपछडे यांनी सूचविले. या बैठकीत खा.अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड रेल्वे विभागातील सर्व खासदरा,महाप्रबंधक अरुण कुमार जैन, डीआरएम श्रीमती नीति सरकार, यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.