नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 25 वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. गेल्यावेळी 61 टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत 67.81 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली. रविंद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 मते मिळाली तर डॉ. संतुकराव हंबर्डे यांना 5 लाख 85 हजार 331 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ भोसीकर यांना 80 हजार 179 मते मिळाली.
फेरमतमोजणी नाही – दरम्यान पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत इव्हिएमच्या मतासोबतच पोस्टल मतेही निर्णायक ठरली. या पोटनिवडणुकीची फेरमतमोजणी झाल्याची बाहेर चर्चा होती मात्र कुठलीही फेरमतमोजणी झाली नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या 27 फेऱ्या व पोस्टल मतांची मोजणी याद्वारे पुर्णता पारदर्शक पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून निकाला जाहीर करण्यात आला. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने नेमलेल्या दोन वरिष्ठ निवडणूक निरीक्षकांचे सनियंत्रण होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत फेरीनिहाय मिळालेल्या मतांची संख्या घोषित करण्यापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्याकडील अधिकृत नसलेली आकडेवारी बाहेर सांगितली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मात्र पारदर्शी पद्धतीने पूर्ण कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशसनाने स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे व मतदारांचे आभार – दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या दिड महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये यावर्षी मोठ्यासंख्येने नागरिकांनी केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभेसोबतच नऊ विधानसभा निवडणूक पार पडली. शांततेत ही सगळी प्रक्रिया पार पडली असून त्यासाठी सहकारी अधिकारी, पोलीस प्रशासन,राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी, स्वीप सारख्या विविध उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व सर्वक्षेत्रातील मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहे.