हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महिला व मुलींनी भक्तिभावाने देवीची उपासना करून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम रंगवले. शुक्रवारी उशिरा झालेल्या मिरवणुकीनंतर मूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गोंधळ निर्माण झाला.



नगरपंचायतीने तयार केलेल्या दुर्गंधीयुक्त विहिरीत मूर्ती विसर्जनास भाविकांनी तीव्र विरोध दर्शवला. अनेक वर्षांपासून गाळ न काढल्याने कुजलेल्या पाण्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आणि भक्तांना रात्रभर वाट पाहावी लागली.


या दरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मच्छीमार पथक व क्रेनची व्यवस्था करून भाविकांना समजूत घालत शनिवारी सकाळी ६ वाजता कनकेश्वर तलावात विसर्जन सुरू केले. यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. सकाळी १० वाजता वृत्त लिहीपर्यंत विसर्जन शांततेत सुरू असून, अजूनही ७-८ मुर्त्या मिरवणुका मार्गावर आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत विसर्जन शांततेत पार पाडण्यास हातभार लावला.



मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी विसर्जन नियोजनात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तरीही प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल भाविकांमध्ये नाराजी होती. भाविकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “आगामी काळात प्रशासनाने वेळीच तयारी करून अशा अडचणी टाळाव्यात.”



