नांदेड| सीटू कामगार चळवळीत सक्रीय भूमिका बजावणाऱ्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांना यंदाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील व साहित्यरत्न कॉ.अण्णाभाऊ साठे जयंती तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.


हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ दिला जातो. यंदा नांदेड जिल्ह्यातून कामगार हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या उज्वला पडलवार यांची निवड करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी बीड येथील एका विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे भाई मोहन गुंड व अशोक रोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी आशा वर्कर्स, गटप्रवर्तकताई, अंगणवाडी सेविका, घरकामगार महिला, असंघटित कामगार अशा विविध कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि कामगारांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलने उभारली आहेत. त्यांच्या संघर्षशील नेतृत्वामुळे अनेक प्रश्न शासनाच्या निदर्शनास आले आणि कामगार महिलांना न्याय मिळाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित केले जात आहे, ही बाब नांदेडसह राज्यभरातील सामाजिक व कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे.


कॉम्रेड पडलवार यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून,माहूर येथे स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या स्मृतिदिना निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलेल्या आशा आणि गटप्रवर्तक ताईंनी कॉ. पडलवार यांचा येथोचित सत्कार केला आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे. आणि लवकरच त्यांना तो देण्यात येणार आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्या संदर्भात सर्वत्र चर्चा होत असून यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे


