हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शहरातील परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसर आणि उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल जवळ गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. तसेच या ठिकाणी कचरा कुंडीच उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचून राहिला असून, प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.


त्यामुळे मार्केट व बस स्थानक परिसर अक्षरशः कचरा डेपो सारखा झालेला असून, वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून, साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.


दररोज ग्रामीण भागातून येणारे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला तसेच दर्शनार्थी भक्त अमोल मेडिकल कॉर्नरच्या रस्त्याने आणि बसस्थानक परिसरातून ये-जा करतात. परंतु दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून जाण्याची वेळ येत आहे.



या दुर्गंधीयुक्त व घाणीच्या वातावरणामुळे हिमायतनगर शहराची बदनामी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. म्हणूनच तातडीने कचरा उचलून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात यावी, आणि नियमितपणे घाण साफ करून सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

हिमायतनगर शहरातील मुख्य चौकात गेल्या आठ दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. कचरा कुंडी नसल्याने ढिगारे साचले असून, दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथरोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता या कचऱ्यामुळे दूषित झाला असून गावाची इज्जत वेशीला टांगली जात आहे, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून येणारे लोक शहरातील नागरिकांना “आमच्या खेड्यांवरही अशी परिस्थिती नाही, तुम्ही इथे कसे काय सहन करता?” अशी टीका करत आहेत. या समस्ये बाबत स्थानिक व्यापारी अमोल पेन्शनवार व इतर परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने कचरा उचलण्याची मागणी केली आहे.

