नांदेड| “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईहून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आगमनावेळी विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण होते. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नांदेड येथे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे विमानतळावरून गुरुद्वारा आणि मोदी मैदान येथे आयोजित “हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमस्थळी रवाना झाले.


तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दर्शन गुरुद्वारा बोर्डाकडून मान्यवरांचा सन्मान

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंग आदी मान्यवरांनीही दर्शन घेतले. दर्शनानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने मुख्यमंत्री व सर्व मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचेही तख्त सचखंड येथे दर्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही तख्त सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे दर्शन घेतले. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीदेखील दर्शन घेतले. या वेळी गुरुद्वारा बोर्डाकडून सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

