किनवट, परमेश्वर पेशवे| शहरातील हुतात्मा गोंड राजे मैदान पाठीमागे असलेल्या बोरवेल भोवती दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले असून बंदिस्त वॉल कंपाऊंड नसल्यामुळे अनेक तळीराम व इतर येथे लघु शंका करतात, त्याच बोरवेलचे पाणी सिद्धार्थनगर व साठेनगरला पुरवठा होते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे संकेत निर्माण झाले असून या प्रकारात न. पा. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून त्वरित सदर बोरवेलला वॉल कंपाऊंड करावे. जेणेकरून घाणीचा उपद्रव होणार नाही व महात्मा फुले चौक ते बाबुलाल रेडिओ दुकानापर्यंतच्या नालीची सफाई करावी अशा आशयाचे निवेदन मातंग समाज संघटना व दिव्यांग संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका किनवट यांना देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागरिकांचे जीव धोक्यात येणारे विषय तातडीने मार्गी लावले पाहिजे परंतु येथे “लेकरू रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही” असा प्रकार न.पा. प्रशासनात चालतो हे काम नगरपालिका मधील सत्तेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे असते, त्यासाठीच जनतेने त्यांना निवडून दिलेले असते, परंतु असे काम ते का करत नाहीत कळत नाही. आता तर नगरपालिकेवर प्रशासक राज आहे. अखेर अशा सामाजिक संघटनेला पुढाकार घेऊन प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दाद मागावी लागते हे जनतेचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. सदर बोरचे पाणी वापरण्यासाठीचे परंतु सामान्य गरीब जनता पिण्यासाठीही वापरतात, मग सदर बोरवेल जवळ डुकरांचा वावर, अंधारात येथे लघु शंका करतात.
लाकडी भुसा बोर मधे जातो, सलून वाले तेथेच केस टाकतात परिणामी पावसाळ्यात पाणी मुरून आतमध्ये जाते आणि त्याचा दुष्परिणाम सदर बोरवेलचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांना होणारच त्यासाठी तात्काळ वॉल कंपाऊंड करा अशी लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली आहे. सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून नगरपालिका किती दिवसात सदर बाबीचे निराकारण करणार व कधी न्याय मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे. सदर निवेदनावर मातंग समाजाचे तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार, मातंग समाज तालुका उपाध्यक्ष गंगाधर मुकणेपेल्लीवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेलीवार, सुनील इंगोले, रवी कुमार दिसलवार व पोषराव सावंतपेल्लीवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.