नांदेड| उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भगरीचे सेवन केले जाते. मात्र, भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे भगरीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन विषारी द्रव्ये तयार होतात. अशा स्थितीत भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी भगर खाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


नागरिकांनी घ्यायची काळजी
भगर पॅकबंद व ब्रँडेडच घ्यावी. पॅकींग व अंतिम वापर दिनांक तपासावा. भगर स्वच्छ, कोरड्या डब्यात साठवावी. जास्त दिवस भगर व भगर पिठाचा साठा करू नये. भगर पिठाऐवजी खिचडीचे सेवन करावे. सलग उपवासात भगर व शेंगदाण्याचे अति सेवन टाळावे, कारण त्यामुळे ॲसिडिटी, मळमळ, पोटाचे त्रास उद्भवू शकतात.


विक्रेत्यांसाठी सूचना
फक्त पॅकबंद भगरची विक्री करावी. खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. मुदतबाह्य भगर किंवा सुटी भगर व खुले पीठ विक्रीसाठी ठेवू नये.


अन्न व औषध प्रशासन भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करीत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.



