हिमायतनगर, अनिल मादसवार| अतिवृष्टीच्या संकटाने सर्व काही नष्ट होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही भारतीय परंपरेनुसार साजरा होणारा वृषभराजाचा पोळा हिमायतनगरात उत्साहात पार पडला. नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची मिरवणूक ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातुन काढण्यात आली.


शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावास्येनिमित्त पोळा सण पार पडला. सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना स्नान घालून रंगीबेरंगी सजावट केली होती. वार्निश, घुंगरमाळ, झुली, कासरे, गोंडे आदी सजावटींनी सजलेले बैल गावोगावी व शहरात आकर्षण ठरत होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सडा-संमार्जन करून शेतीअवजारे आणि पळसाच्या मेढ्याची पूजा-अर्चना केली.


सायंकाळी 4 वाजता नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांनी मानाच्या बैलांची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात केली. जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ दाखल झाली. यावेळी ढोल-ताश्यांच्या गजरात वाजत-गाजत, नाचत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



पुरोहित गजूगुरू वाळके व परमेश्वर बडवे यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्टकात सायंकाळी ४ वाजून ४१ मिनिटांनी वृषभराजाचा विवाह सोहळा पार पडला. शहरातील लहानथोरांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पोळा मिरवणुकीत नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, नागरिक, लहान थोर मंडळीनी उपस्थिती लावली होती.


लग्नानंतर लगेच पोळ्याची रीघ सुसाट वेगाने धावत सुटली, ते आपल्याघरी जाईपर्यंत थांबली नाही, घरी जाताच वृषभ राजाची आरती, महापुजा करून पुरण पोळीचे नैवेद्य, बैलांच्या पायावर काकडी फोडून मजूरदार व निमंत्रीताना पुरण पोळीचे भोजन देण्यात आले. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात होता.
