हिमायतनगर│ दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात राहण्याची वेळ आली आहे. गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.


तुकामाई मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर तर अक्षरशः घाण आणि तीव्र दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. पाय ठेवायलाही जागा नसल्याने रहिवाशांना घाणीतूनच ये-जा करावी लागत आहे. या भागात पंधरा दिवसांपासून कचरा न उचलल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.


नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही वारंवार नगरपंचायतीला घाण सफाईबाबत तक्रारी आणि सूचना केल्या, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही. घरपट्टी आणि टॅक्स वसुलीकरिता मात्र नगरपंचायतीचे अधिकारी नियमित येतात, पण घाण साफ करण्यासाठी कोणीही येत नाही.”


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याची अपेक्षा असताना नगरपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. दुर्गंधी, घाणीचे ढीग आणि डास-माशांच्या वाढत्या उत्पातामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.



स्थानिकांकडून नगरपंचायतीने तात्काळ स्वच्छता मोहीम सुरू करून रस्त्यावरची घाण हटवावी, नियमित साफसफाईसाठी कर्मचारी नेमावेत आणि दिवाळीपूर्वी परिसर स्वच्छ करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. नगरपंचायतीने लवकरच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.


