नांदेडधार्मिक

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा परिसरात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृष्ण त्रयोदशी, दि. 15 (रविवार) रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्यरात्री तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात श्रींचा महाअभिषेक, पूजा-अर्चना व अलंकार सोहळा (A grand alankar ceremony of Lord Shri Parmeshwar) भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

महाशिवरात्रीच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी भाविकांची सकाळी ३ वाजल्यापासूनच मंदिर प्रांगणात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने मंदिर समितीने विशेष सुविधा, बंदोबस्त तसेच चहा-फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. निमित्तानुसार मंदिराच्या कळसावर, मुख्य कमानीवर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण शहर भक्तीमय प्रकाशात न्हाऊन निघाले आहे.

शिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच शहरात वाडी-तांडे व खेड्यापाड्यांतून भाविकांची रेलचेल सुरू झाली आहे. बैलगाडी, जीप, बस, रेल्वे आदी साधनांनी कुटुंबासह भाविक दाखल होत असून सकाळपासून सूर्यास्तापर्यंत लाखो भक्त श्री परमेश्वराचे दर्शन घेणार असल्याचे चित्र आहे. मंदिर परिसरात बेलपत्रे, मिठाई, फराळ, तर मुख्य रस्त्यावर फळे-फुले व विविध पूजेच्या साहित्याची दुकाने सजली असून यात्रेला रंग चढताना दिसत आहे.

परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ, दुपार व संध्याकाळ—दिवसातून तीन वेळा श्री परमेश्वराचे सगुणरूपी दर्शन होते, असे जुने जाणकार सांगतात. दुपारी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन, तर रात्री ८.३० वाजता ह.भ.प. शिवाजी महाराज पवार (पैठण) यांच्या मधुर वाणीतून हरिकीर्तन होणार आहे.

कीर्तनानंतर रात्री ०१ ते ०२ दरम्यान शिवापती मंदिरातील शिव-पार्वती अभिषेक सोहळा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात संपन्न होईल. त्यानंतर महापूजा होऊन श्री परमेश्वराच्या मूर्तीला सोने-चांदीचे अलंकार, टोप, चंद्रहार, दोन-तीन-पाच पदरी हार, कर्णकुंडले, गंठण आदी आभूषणे चढविण्यात येणार आहेत.

अलंकारविभूषित श्रींचे देखणे दर्शन भाविकांना दहीहांडी-गोपाल काला पर्यंत घेता येणार आहे. या सगुणरूपातील दर्शनाचा लाभ घेऊन भाविकांनी पुण्यप्राप्ती करावी, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी, यात्रा उपसमिती व ग्रामस्थांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button