नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील आंदेगाव शिवारात सोलार प्रोजेक्ट उभारणीसाठी लागणारे विनातारण फॉरेन फंडिंग लोन 4% व्याजदराने मिळवून देतो. एमआयडीसीचा पॉवर परचेस करार करून देतो, ग्रिड कनेक्टिव्हिटीसह सर्व शासकीय परवानग्या काढून देतो. अशा विविध आमिषांचा आधार घेत औरंगाबाद येथील पांडूरंग परसराम जाधव यांनी 36,70,444 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे.


या प्रकरणी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक अनगुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420, 406, 465, 467, 468, 470, 471, 34 अन्वये पांडूरंग परसराम जाधव यांच्यावर 24 सप्टेंबर रोजी सायं. 7.16 वाजता हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजमोद्दीन शेख, पोलीस जमादार नामदेव जाधव व पोहेकाॅ चंद्रकांत आरकिलवाड हे करीत आहेत.

पोलीस डायरीतून मिळालेल्या सविस्तर माहितीप्रमाणे, औरंगाबाद येथील पांडूरंग जाधव व त्याचे सहकारी यांनी सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अशोक अनगुलवार यांचा विश्वास संपादन करून सेवादास सोलार टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ही प्रत्यक्षात बंद झालेली कंपनी चालू असल्याचे भासवले. बनावट माहिती पुस्तिका व कागदपत्रे दाखवून, तसेच खोट्या पावत्या देऊन 36 लक्ष 70 हजार 444 रुपये रोख व इतर खर्चाच्या स्वरूपात स्वीकारले.


तसेच या पद्धतीने अनगुलवार यांच्या परिचयातील डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांच्यासह इतर काहींचीही फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी अशोक अनगुलवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.


