हिमायतनगर,अनिल मादसवार। उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण महिना 2024 निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदीर, हिमायतनगर येथील उत्सव आणि यात्रेबाबत आढावा बैठक प्रशासकीय स्तरावरून प्रथमच दिनांक 02 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता श्री परमेश्वर मंदीर देवस्थान सभागृह, हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.त्यामुळे श्री परमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिराच्या उत्सवासाठी शासनाने देखरेख व कामकाजाला आज होणाऱ्या बैठकीपासून सुरुवात केली असावी असे वाटते आहे.
यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यात आलेले सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व आनंदाने संपन्न व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रोजी सकाळी 10.30 वाजता परमेश्वर मंदीर देवस्थान सभागृह, हिमायतनगर येथे तालुक्यातील सर्व संबधित यंत्रणा यांची श्रावण महिना 2024 आढावा बैठकिच आयोजित केले आहे. विद्यमान सरकारने महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळ विकास व त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्राधान्य दिले आहे, आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने जे केले नाही ते कार्य होत आसल्याने त्याचाच एक भाग म्हणून श्री परमेश्वर मंदिराकडे पाहिले जाते असल्याचे श्रीक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा ठेवण्यात आलेल्या आजच्या आढावा बैठकीवरून दिसून येते आहे.
या बैठकीला सचिव/संचालक, श्री. परमेश्वर मंदीर देवस्थान कमिटी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, शासकीय ग्रामीण रुग्नालय, मुख्यधिकारी, न.प. हिमायतनगर, पशुधन विकास अधिकारी, पशु वैद्यकिय दवाखाना श्रेणी-१, उप कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपकार्यकारी अभियंता, उप विभाग कार्यालय महावितरण, बस आगार प्रमुख हिमायतनगर, अन्न व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग भोकर/किनवट, मंडळ अधिकारी, तलाठी सजा हिमायतनगर व संबंधित उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीसाठी परमेश्वर मंदीर देवस्थान सभागृह, हिमायतनगर येथे संबंधित सर्वानी स्वतः आवश्यक माहितीसह दिलेल्या वेळत न चुकता उपस्थित रहावे.
अन्यथा बैठकीसाठी अनुपस्थित अधिकारी/कर्मचारी यांचेविरुध्द नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. एकूणच प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच हिमायतनगर ते श्रावण मासानिमित्त आढावा बैठकीचे आयोजित केल्यामुळे हिमायतनगर येथील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या श्रावण महिन्यातील उत्सवाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे एकूणच श्रावण महिन्यात होणारी भावीक भक्तांची गर्दी आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न होतील. यासाठी हे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे समजते.
संबंध भारतात प्रसिद्ध असलेले हिमायतनगर वाढोणा येथिल श्री परमेश्वर मंदिराचे कार्य धर्मदाय आयुक्त यांच्या नियंत्रण आणि तहसीलदार हिमायतनगर यांच्या देखरेखीखाली मंदीराचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ व सर्व सांचालक मंडळाच्या सानिध्यात अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालविले जाते आहे. आत्तापर्यंत मंदिराच्या विकासाची प्रगतीचा आलेख उंचावत आलेला असून, तसेच विविध सामाजिक, शालेय आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित, समाजायक बांधिलकी जोपासत गरजूं मदत करण्याची परंपरा देखील मंदिराने चालविली आहे. गेल्या वर्षपासून आणखी मंदिराच्या व्यवस्थेसह सर्व सोइ सुविधांमध्ये सुधारणा केली जाते आहे. त्यामुळे मंदिराची ख्याती दूरदूरवर पसरली असून, दार सोमवारी, महाशिवरात्री यात्रा उत्सव आणि गेल्या काही वर्षांपासून श्रावण महिन्यातील संपूर्ण महिनाभर धार्मिक उत्सव तथा यात्रा आनंदाने व उत्साहपूर्ण वातावरणात होत असते अशी माहिती मंदिराचे सचिव अनंतराव देवकते यांनी दिली आहे.