नांदेड। मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नसून बळीराजा त्रस्त असल्यामुळे माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार दि.३०जुन रोजी सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले असून रत्नेश्वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया,कोयी पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

बालाजी मंदिर हनुमानटेकडी येथून सुरू होणार्या या पाऊस दिंडीचे यंदाचे तेविसावे वर्षे आहे.तेविसावी अमरनाथ यात्रा ५ जुलै ला व चोवीसावी अमरनाथ यात्रा १९ जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडी मध्ये करण्यात येते. रस्त्यामध्ये जागोजागी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, पवन गुरुखुदे, कैलास महाराज वैष्णव, गणेश झोळगे, स्वच्छता दुत माधवराव झरीकर, विश्वेश्वर महादेव मंदिर नवीन सिडको यांच्या तर्फे चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे .

दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नेश्वरी देवस्थान व अन्नपुर्णा माता देवस्थान तर्फे अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात येणार आहे.पाऊस दिंडी मध्ये यात्रेकरू सोबत सहभागी होऊ इच्छिणार्या नागरिकांनी आपल्या घरी जमा असलेल्या बिया, कोयी सोबत घेऊन यावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
