नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बाजार येथे दिनांक 26.05.2009 रोजी झालेल्या खुनाच्या घटनेतील आणि मकोका गुन्ह्यातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश शिंगाडे (Criminal Avinash Shingade) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथे नाव बदलून राहत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून अखेर स्थागुशाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस ठाणे हिमायतनगर येथे गुरनं 34/2009 कलम 302, 147, 148, 149,506 भादवि मधील गुन्हा घडल्यापासुन फरार असलेल्या आरोपीचे शोधकामी माहितीगार अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीना अटक करणे बाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड (Local Crime Branch) यांना आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील विठ्ठल घोगरे सहायक पोलीस निरीक्षक व नियंत्रण कक्ष येथील पोलीस उप निरीक्षक बळीराम दासरे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन, त्यांना गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेशित केले होते.

त्यावरुन विठ्ठल घोगरे सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह पोलीस ठाणे हिमायतनगर परीसरात रात्रंदिवस अथक परिश्रम घेवुन, गोपनिय बातमीदार नेमुन गुप्त बातमीदारांच्या माहितीवरुन व सायबर सेल ने पुरविलेल्या तांत्रिक माहितीवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी हा मध्यप्रदेश येथे नाव बदलुन व बदललेल्या नावाचे नविन आधार कार्ड तयार करुन मध्यप्रदेश येथे राहत असल्याचे खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मध्यप्रदेश येथे जावुन गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेतला. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अविनाश पि. रघुनाथ शिंगाडे ऊर्फ दयानंद रुख्माजी पवार वय-50 वर्षे व्यवसाय-चालक रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर, जि.नांदेड ह.मु. ग्रामपंचायत काकराखेडी-अमलाजोड डोडी ता. आष्टा जि. सिहोर राज्य मध्य प्रदेश यास ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले आहे.

आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपी अविनाश पि. रघुनाथ शिंगाडे ऊर्फ दयानंद रुख्माजी पवार वय-50 वर्षे व्यवसाय-चालक रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर, जि. नांदेड ह.मु. ग्रामपंचायत काकराखेडी- अमलाजोड डोडी ता. आष्टा जि.सिहोर राज्य मध्य प्रदेश यास पुढील तपासकामी पोलीस ठाणे हिमायतनगर यांचे स्वाधिन करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात 15 वर्षापासुन फरार असलेले आरोपीस ताब्यात घेवुन नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, व्हि.एच.घोगरे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, बळीराम दासरे, पोलीस उप निरीक्षक, नियंत्रण कक्ष, नांदेड, पोलीस अंमलदार सहा. पोलीस उप निरीक्षक गुंडेराव करले नेमणुक पोलीस ठाणे लिंबगांव, देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार नेमणुक द. वि. पथक, राजु बोधगीरे, इज्राईल शेख खंडणी विरोधी पथक, अकबर पठाण नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे नेमणुक सायबर सेल, नांदेड यांनी केली आहे.