भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. स्वातंत्र्याचा उत्साह सर्वत्र पसरला असताना आमच्या भागात प्रचंड खदखद आणि अस्वस्थता जुलमी रजाकारांचे अत्याचार हे कायमच हेाते. या कालावधीत स्वातंत्र्यप्रिय धाडसी व्यक्तिंनी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याप्रतीची भावना जाज्वल्य करण्यासाठी पुढाकार घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे. गोविंदराव पानसरे हे पूर्वाश्रमींच्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूरचे होत. हल्ली हे गाव जालना जिल्ह्यात आहे.
गोविंदराव पानसरे यांची जन्मभूमी हल्लीची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असली तरी कर्मभूमी बिलोली तालुका होता. धर्माबाद, नायगाव हे दोन्ही तालुके पूर्णत: बिलोली तालुक्यात होते. २३७ गावांचा बिलोली तालुका, महाराष्ट्रातील सर्वात मोठा विस्तारलेला तालुका होता. तालुक्याच्या विभाजनानंतर धर्माबाद, उमरी, नायगाव हे तालुके तयार झाले. पूर्वाश्रमीच्या बिलोली तालुक्यातील गोविंदरावपानसरे यांनी महात्मा गांधीच्या विचारांचे अनुसरन करून रजाकारी, अत्याचारी वृत्ती विरूद्ध झगडत होते. याची खबर जुलमी रजाकारांना होती. यामुळे त्यांना बिलोलीच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना बिलोली जवळ गाठून हत्या करण्यात आली. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या विचारांचा या भागात मोठा पगडा निर्माण झाला होता. परमेश्वरराव उर्फ परमेशा मुंडकर यांना याविषयीची बरीच जाणीव होती.
आपली जाणीव ही ‘जागृती’ करत हे कुटुंब आपल्या कुवत आणि क्षमतेप्रमाणे जुलमी रजाकारांविरूद्ध सक्रीय झाले होते. याचा बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांच्यावर अधिकच पगडा होता. वाचन, मनन, चिंतनातून धाडसी वृत्तीने मित्राच्या साथीने लढवय्ये बनले होते. किशोर अवस्थेतही भरदार छाती, उंच, सावळा रंग यामुळे शाळेत शिक्षकांचे मित्र तसेच विद्यार्थ्यांचेही मित्र बनलेले बसवंतराव मुंडकर किशोर अवस्थेत विविध चळवळीत भाग घेतल्याचे श्री शामराव जोशी यांच्या मांडणीतून दिसून येते. स्व.बसवंतराव मुंडकर हे केवळ एका चळवळीत सहभाग घेऊन गप्प बसलेले व्यक्तिमत्त्व नव्हते तर देशसेवेच्या विचाराने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्त्व असल्याचे गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घेतलेल्या सहभाग यातून स्पष्ट दृष्टीगोचर होतो. याबाबतची सुबोध मांडणी “चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस” या ग्रंथातून हेाते.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने ग्रंथ जेवढे अपेक्षित आहेत आणि उपलब्ध आहेत, हे पाहता याविषयीची मांडणी आणि लिखाण म्हणावे तसे झाले नाही, असे स्पष्ट होते. यात जी ग्रंथ उपलब्ध आहेत. ती लोकाभिमूख होणे गरजेचे आहेत. यासाठी समाज धुरीनांचे प्रयत्न गरजेचे वाटतात. स्व.बसवंतराव मुंडकर यांच्या विषयीच्या “चळवळीतला उपेक्षित ‘बाप’ माणूस” या ग्रंथातील निवृत्त अधिकारी तथा बिलोलीचे ज्येष्ठ नागरीक वैजनाथ मेघमाळे यांची मांडणी जणू गावाकडली पारावरची सुलभ भाषेतील बैठकीतील मांडणी वाटते. वैजनाथ मेघमाळे यांचे चिरंजीव महेश मेघमाळे हे नांदेड येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
उच्च पदस्थ कुटुंबिय स्व.बसवंतराव मुंडकर त्यांचे वडील परमेशा मुंडकर यांच्याविषयी प्लेगच्या राष्ट्रीय आपत्ती काळातील आठवण मांडत म्हणतात की, मुंडकर परिवार हा परोपकारी होता. त्यांनी आम्हांला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. जीव वाचवायच्या काळात मिळालेली मदत याबाबत कृज्ञतता प्रगट होत असताना स्व.बसवंतराव मुंडकर व त्यांचे वडील परमेशा मुंडकर आपत्ती काळात कसे वागले, हे वाचून स्व.बसवंतराव मुंडकर व त्यांच्या वडिलांची विचारांची उंची त्या लिखानातून स्पष्ट झाली.
भूमन्ना नरोड यांची बालवयातील आठवणी मांडताना स्व.बसवंतराव मुंडकर यांनी डॉ.मोहन मावळगे आणि भूमन्ना नरोड यांना दिलेले देशसेवेचे धडे याचबरोबर चुकीचे वागणाऱ्याला खडसावण्याची वृत्ती ही बाब सुलभपणे भूमन्ना नरोड यांनी मांडली. तद्वतच त्यांना मिळालेल्या सदिच्छा या कशा साकार झाल्या ही मांडणी उद्बोधक आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु यांनी वाचन, मनन, चिंतन आणि या कुटुंबियांचा आलेला संपर्क स्व. बसवंतराव मुंडकर यांच्याबाबत आयोजित अनेक कार्यक्रमात घेतलेला सहभाग या बाबी उद्धृत करून स्व.बसवंतराव मुंडकर यांच्या कार्याची अलगद जाणिव करून दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुसारख्या व्यक्तिंनी स्व.बसवंतराव मुंडकर यांच्या कार्याविषयी जाणून घेऊन केलेलीमांडणी समाजासाठी माहिती देणारी बाब तर ठरेलच याचबरोबर भविष्यात त्यांचे कार्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने पहिले पाऊल पडेल असेमला वाटते.
देगलूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा होट्टल येथील तात्या देशमुख तद्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, तद्कालीन आमदार सुभाष साबणे, भारत सरकार युवा अधिकारी चंदा रावलकर, महाराष्ट्र शासनाचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, आदींची मांडणी प्रसंगानुरूप प्रभावी अशीच आहे. या ग्रंथाचा मूळ गाभा याला स्पर्श करणारी प्रस्तावना इतिहास तज्ज्ञ ज्येष्ठ लेखक प्रभाकर देव यांची आहे. देव यांची सुबोध मांडणी इतिहासातील टिप्पणी, मनन चिंतनातून कोरलेली ऐतिहासिक अक्षरे ग्रंथाला सुशोभितच नव्हे तर ज्ञानवर्धक दस्ताऐवज बनण्यासाठी मोलाची कामगिरी केल्याचे दिसते. हा लेखसंग्रह केवळ वाचनीयच नाही; तर ऐतिहासिक दस्ताऐवज बनला आहे. प्रत्येकांनी आपल्या संग्रहात हे पुस्तक ठेवावे असेच वाटते. यातून वडिलांच्या विषयीची कृतज्ञता, बऱ्याचदा प्रगट होताना दिसते. मुंडकर कुटुंबिंयातील कनिष्ठ चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार गोविंदजी मुंडकर यांच्या अर्धांगिनी सौ.ललिता बंडे यांचे संपादित पुस्तक भारतीय संस्कृती जपण्यासाठी पडत असलेले पाऊल बदलत्या समाजरचनेत काळाची गरज वाटते. या पुस्तकाचे प्रकाशन प्रथमेश करीत आहे. प्रथमेश प्रकाशनाच्या विविध पुस्तकात हे पुस्तक अधिक लोकप्रिय होईल अशी मला आशा वाटते.
लेखक – डॉ.शिवदास हमंद, नांदेड, मोबा. 9420848629