नांदेड, अनिल मादसवार| “गुटखा विक्री थांबणारच” असा ठाम इशारा देत पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या थेट नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सलग छाप्यांत ७३ लाख रुपयांचा अवैध गुटखा आणि एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी तस्करीच्या साखळीला जोरदार हादरा दिला.


विशेष पथकाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यासोबतच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १० लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यानंतर पथकाने मोर्चा वळवला नांदेड शहरातील द्वारका भागाकडे. येथे एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा आणि २० लाख ५० हजार रुपयांची वाहने जप्त करत पोलिसांनी अवैध साठ्यावर घाव घातला. या कारवाईत ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपासात मोठी नावे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



दोन्ही जिल्ह्यांतील एकत्रित कारवाईत ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा, तीन चारचाकी वाहने व एक ट्रक असा सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे. ही केवळ जप्ती नसून, गुटखा तस्करीच्या साखळीवर दिलेला थेट आघात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथक, स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “आपल्या परिसरातील गुटखा, दारू किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती द्या; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.” यासाठी हेल्पलाईन क्रमांक ९१ ५० १०० १०० किंवा पोलिस संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुटखा माफियांविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र होणार असून, अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने केला आहे.

