नांदेड। प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरा दिवसा जड वाहनाच्या वाहतुकीवर नियमानुसार बंदी असते. परंतु सिमेंट, रेती , गिट्टी , विट इत्यादी बांधकाम साहित्याचे ठेकेदार तथा वाहतूकदार अनियंत्रित होत या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. अर्थातच हे काम पोलीस प्रशासनातील ढिलाईमुळे होत आहे. व्यावसायिकांच्या या अवैध वाहतुकीमुळे अनेक निष्पाप लेकरांचा बळी जात आहे.

शहरातील अरुंद व अतिक्रमित रस्त्यांवर ही समस्या अधिकच बिकट झालेली आहे. मल्हार चौककडे जाणाऱ्या सांगवी – तरोडा या अरुंद शीव रस्त्यावर काल दुपारी चार वर्षीय बालकाचा रेतीच्या टिप्परने बळी घेतल्याची अतिशय दुखद घटना घडली आहे. कारण ह्याच बालकाचे तरूण वडील दोन दिवसापूर्वी नांदेड ईदगाह परिसरातील गोदाकाठावर नदीत पोहताना वाहून गेले होते. अथक शोध मोहिमेनंतर त्या पिडीत युवकाचा मृतदेह खूप दूरवर आढळून आल्याचे कळाले. मयताच्या दफनविधीची तयारी सुरू असतानाच त्याचा निरागस बालकही टिप्पर अपघाताचा बळी ठरला.

ह्याला कारणीभूत अरूंद रस्त्यावर दुकानदारांकडून केलेले अतिक्रमण व शहरातील अनियंत्रित जड वाहतुकीची समस्या असल्याचे बोलले जात आहे . महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची व पोलीस प्रशासनाकडून दिवसा शहरात जड वाहतुकीवर बंदी घालण्याची रोषपूर्ण मागणीची चर्चा जनतेत होत आहे. दुसरीकडे एखाद्याच्या जीवनाची परीक्षा असला अंत करून घेण्यामागे अल्लाहचा काय हेतू असू शकतो ह्याबाबत मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
