नांदेड | पारंपरिक शेतीतील तोट्याच्या चक्राला छेद देत मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीला नवी दिशा दिली आहे. रासायनिक खतांवर अवलंबून असलेल्या पारंपारिक पिकांना बाजूला सारत आयुर्वेदिक औषध वनस्पतींची लागवड करून या शेतकऱ्याने लाखोंचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे.


या यशस्वी प्रयोगामागे आहेत बालाजी महादवाड. त्यांनी आपल्या ११ एकर शेतीत चिया, अश्वगंधा, अजवाइन, कलुंजी, इटालियन तुळस यांसारख्या मागणी असलेल्या आयुर्वेदिक औषध वनस्पतींची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्यांनी सातत्याने हा प्रयोग राबवला असून तो पूर्णतः यशस्वी ठरला आहे.

महादवाड यांनी १० एकर क्षेत्रात सुमारे ४ लाख रुपये खर्च केला. मात्र योग्य नियोजन, बाजारपेठेची निवड आणि औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत खर्च वजा जाता तब्बल १७ लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवला आहे. विशेष म्हणजे, या पिकांना तुलनेने कमी पाणी लागते, देखभाल सुलभ असते आणि बाजारभावही स्थिर असल्याने आर्थिक जोखीम कमी होते.



“माझा स्वतःचा अनुभव पाहता, भविष्यात शेती टिकवायची असेल तर शेतकऱ्यांनी औषधी व आयुर्वेदिक वनस्पतींकडे वळले पाहिजे,” असे आवाहन प्रयोगशील शेतकरी बालाजी महादवाड यांनी केले आहे.

डोंगरगावच्या या यशकथेमुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रेरित झाले असून, बदलत्या काळात औषधी वनस्पती शेती हीच शाश्वत व नफ्याची दिशा ठरू शकते, हे महादवाड यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
