नांदेड| विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत असून आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी हे महत्त्वाकांशी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. सर्व अधिकारी आणि सर्व शाळांनी यात आपला सहभाग देण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहेत.
या अभियानादरम्यान पहिल्या 20 दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर 6 दिवस आवश्यकतेनुसार सुधारणा व उपाययोजना करणे, त्यानंतर 4 दिवसांमध्ये अनुपालनाची खात्री करणे असा हा कार्यक्रम आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे 2 दिवस कार्यालयीन कामकाज आणि उर्वरित तीन-चार दिवस शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, पर्यवेक्षकीय अधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी हे शाळा भेटी देणार आहेत. तसेच शाळा भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता विकासाची पाहणी करणार आहेत.
शाळा स्तरावरील अहवाल लॉगिन मधून दररोज अद्यावत करण्यात येणार आहे. या संदर्भाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना शाळा भेटी करण्याबाबत आदेशित करण्यात आले असून सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांना भेट देऊन गुणवत्ता विकासाची पाहणी करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी केले आहे.