देगाव (ता. नायगाव) l दिवाळीच्या मंगलमुहूर्तावर देगाव येथे १११ जेष्ठ नागरिकांना भारत सरकारच्या ‘ राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र पीएमडीके – मुंबई या योजने मार्फत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलिम्को ) चे कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात आले. समाजसेवेची भावना जोपासत या उपक्रमाचे आयोजन डॉ. दत्ता मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.


गुडघेदुखी, पाठदुखी, चालता न येणे, श्रवणदोष अशा विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमातून मोठा आधार मिळाला. ऑपरेशन न करता चालण्यायोग्य व दैनंदिन जीवन सुलभ करणारी १६ प्रकारची साधने या शिबिरात वाटप करण्यात आली. यामध्ये श्रवणयंत्र, वॉकर, पाठीचा व गुडघ्याचा पट्टा, ब्रेकसह खुर्ची, कमोड खुर्ची, सिलिकॉन कुशन, मानेचा पट्टा, काठी आदी साधनांचा समावेश होता.


या उपक्रमासाठी डॉ. मोरे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत सहाय्य उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमास शेतकरी शेतमजूर पंचायतचे राज्याध्यक्ष बळवंतराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब मोरे, रावण भंडरवाड, ग्रामसेवक मोहनराव अडकिने, माजी सरपंच उत्तम मोरे, योजना कर्मचारी राजकिशोर, साईनाथ घोडके, संतोष घोडके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, राहुल गायकवाड, शुभम भद्रे, रामराव चव्हाण, किशोर मोरे, संभाजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


या योजनेच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत अधिकारी मोहनराव अडकिने, लिपिक योगेश पुंड, सेवक सलमान शेख, अमीर पठाण आणि सुधाकर मामा यांनी परिश्रम घेतले. लाभार्थ्यांनी सहाय्यभूत साधने मिळाल्याबद्दल समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. डॉ. दत्ता मोरे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



