हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील नगर पंचायत सन 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी (घोळ) (Big mistake in Himayatnagar’s voter list) झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 1 ते 17 मधील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला असून, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


शिवसेना शिंदे गटाचे हिमायतनगर तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले राम भिमराव ठाकरे यांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, सन 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदार यादीचा आधार न घेता, काही कर्मचारी व अधिकारी यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून घरे एका प्रभागात असताना 150 ते 200 मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट केली आहेत. हा प्रकार प्रत्येक प्रभागात आढळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


यासंदर्भात त्यांनी प्रमुख मागण्या केल्या असून, यात 2016 च्या मतदार यादीचा संदर्भ घेऊन सुधारीत प्रारूप तयार करावे, ज्या मतदारांचे घरे ज्या प्रभागात आहेत, त्यांची नावे त्याच प्रभागात दाखल करावी, ड्रोन सर्व्हे नुसार विभागणी करून नावे दुरुस्त करावीत, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी असेही देण्यात आलेल्या आक्षेप तक्रारीत म्हंटले आहे. या तक्रारीची प्रत आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी, नांदेड, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी, हदगाव, मुख्याधिकारी हिमायतनगर आणि पत्रकार बांधवांसह संबंधितांना पाठविल्या आहेत.



नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता बाजूला ठेवून काहींच्या दबावाखाली प्रारूप याद्या प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे या ‘घोळा’ ची चौकशी करून निवडणूक यंत्रणा निष्पक्ष ठेवण्याची मागणी गतीने पुढे येत आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



