नांदेड | निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई फय्याज याच्यावर वशिलेबाजीचे आरोप होत असून, त्याची १४ वर्षांपासून एकाच ठिकाणी बदली न झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांशी तो हलगर्जीपणे वागत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून करण्यात आल्या आहेत.


डीवायएफआय (DYFI) युवक संघटनेच्या वतीने दि. ६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे दि. १० ऑक्टोबरपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना निवेदन देत मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.


शिपायास मिळत असलेले “अभय” आणि वशिलेबाजीचा मुद्दा जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे टिकून राहणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय कोण देत आहे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिपाई फय्याज याची बदली नांदेड तालुक्याबाहेर करावी. अंगरक्षक व शस्त्र परवान्याच्या गैरवापराची चौकशी करून ठोस कारवाई करावी. सोमेश्वर व वाघी (ता. जि. नांदेड) येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी.


पूरग्रस्तांच्या चुकीच्या पात्र यादीत सुधारणा करून जबाबदारांवर कारवाई करावी. वझरा (ता. माहूर) येथे ग्रामसभा ठरावानुसार मोफत प्लॉट वाटप करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डीवायएफआयकडून देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनावर दबाव वाढत असून या प्रकरणातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




