हदगाव, गौतम वाठोरे | “जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची जाणीव असेल तर गरिबी देखील स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे बरडशेवाळा (ता. हदगाव) येथील स्नेहा बालाजी सोळंके हिने.


दिवसभर भाजीविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बालाजी नारायण सोळंके आणि आईच्या कष्टांत वाढलेली स्नेहा गावातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर बनली आहे.


तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. अभ्यासात नेहमीच आघाडीवर असलेल्या स्नेहाने नवोदय परीक्षेत यश मिळवत पुढील शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत तिने दहावीत ९६ टक्के गुणांसह शाळेत दुसरा क्रमांक पटकावला. बारावीनंतर तिने NEET परीक्षेद्वारे नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला.


लहानपणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने आई-वडिलांच्या कष्टातून साकारले आणि आज त्या दोघांचे डोळे अभिमानाने पाणावले.

गावकऱ्यांकडून स्नेहाचा सत्कार – बरडशेवाळा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत स्नेहाचा सत्कार करून तिचा गौरव केला. गावातील भुमिपुत्र व गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश मस्के यांनी कुटुंबीयांसह तिचा सन्मान केला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमास डॉ. मंजुषा मुरमुरे (नांदेड), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. एस.बी. भिसे, डॉ. के.सी. बरगे, पोलीस बिट जमादार अशोक दाडे, तलाठी बोरसुरे, ग्रामसेवक बेग, मुख्याध्यापक सोनटक्के, निवृत्त बँक व्यवस्थापक गणेशराव मस्के व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
बरडशेवाळाची डॉक्टर परंपरागा – वातून याआधी मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ डॉ. शिवाजीराव पोले, त्यानंतर बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के यांनी कर्तृत्व गाजवले आहे. सध्या डॉ. निरज चौधरी, डॉ. प्रज्वल मस्के, तसेच बिऐएमएस शिक्षण घेत असलेले सोपान मस्के वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.
या श्रृंखलेत आता स्नेहा ही गावातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर म्हणून गौरवशाली नोंद झाली आहे. स्नेहाच्या यशाने गावातील अनेक मुलींसाठी नव्या प्रेरणेचा दीप पेटवला आहे.


