नांदेड| राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 17 सप्टेंबरपासून सुरू होत असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा 16 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. हे अभियान 31 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.


अभियानांतर्गत टीबीमुक्त गाव, पाणीपुरवठा, घरकुले, स्वच्छता, वृक्षलागवड, आयुष्यमान कार्ड वाटप, सौरऊर्जा वापर, क्रीडांगण व व्यायामशाळा विकास, शिक्षण-आरोग्य आदी कामगिरीचे 100 गुणांच्या निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे. जानेवारी 2026 मधील मूल्यांकनानुसार ग्रामपंचायतींना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. यात तालुकास्तरावर 15, 12 व 8 लाख रुपये, जिल्हास्तरावर 50, 30 व 20 लाख रुपये तर राज्यस्तरावर 5, 3 व 2 कोटी रुपये पहिल्या तीन क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना देण्यात येईल


या अभियानात ग्रामसभांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक असून, ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय-अशासकीय कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळे, उद्योजक, डॉक्टर, वकील, खेळाडू, साहित्यिक आदी सर्व घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सीईओ मेघना कावली व ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांनी केले आहे.




