नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलां-मुलीसाठी वसतिगृह सुरु केली आहेत. गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजूस नांदेड येथे संपर्क साधून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदर अर्ज 5 जुलै 2024 पुर्वी कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.


राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात मुलांसाठी- 1 व मुलींसाठी -1 अशा दोन वसतीगृहाचा समावेश आहे.


एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टिकून राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे, विद्यार्थी/विद्यार्थीनीना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी 1 व मुलीसाठी 1 अशी दोन वसतीगृहे नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर केलेली आहेत.


इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 10 जुलै 2024 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे सन 2023-24 गुणपत्रक, सन 2023-24 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 24 जून ते 10 जुलै 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .
विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.


