उस्माननगर, माणिक भिसे | अन्न सुरक्षा विभागात पदोन्नतीवर सहायक आयुक्त तथा सहाय्यक संचालक झाल्याबद्दल सुनील काशीराम जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांसह कांबळे परिवारातर्फे उस्माननगर व पोखरभोसी येथे सहृदयी सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड, सरपंच सुरेश मामा बास्टे, माजी सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, सरपंच प्रतिनिधी माणिक काळम, माजी सरपंच आमिनशा फकीर, जावेद मौलाना, पो.हे.का. वामण नागरगोजे, पोलीस कर्मचारी सौ.ज्योती इसादकर, उद्योजक बसवेश्वर वारकड, प्रा. नरेंद्र वारकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मनोगत व्यक्त करताना सुरेश मामा बास्टे म्हणाले, “आजच्या तरुणांनी सुनील जोंधळे यांचा आदर्श घ्यावा. त्यांच्या मेहनतीमुळे व चिकाटीमुळे आज ते उच्च पदावर पोहोचले आहेत. आई- वडिलांचे अभिनंदन की त्यांनी असा कर्तव्यदक्ष अधिकारी समाजाला दिला.”


सत्कारानंतर सहायक आयुक्त सुनील जोंधळे यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी ग्रामीण भागातून आलेलो असून माझे प्राथमिक शिक्षण गावात झाले. शेतकरी कुटुंबातून असूनही आई-वडिलांनी माझे शिक्षण कधी थांबवले नाही, उलट बळ दिले. पुस्तकांशी मैत्री करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मी यश संपादन केले. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, मेहनत करून मोठे अधिकारी घडवावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूर्यकांत माळी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता लक्ष्मण कांबळे, सौ. पुनम अनिल कांबळे, सौ. सुप्रिया सुनिल जोंधळे, सम्यक कांबळे व कांबळे परिवार यांच्याकडून करण्यात आले.


