कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये २८ व २९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी केवळ पाहणीचे सोंग करण्याचे नाटक करीत आहेत.


सरकारच्या शेतकरी विरोधी नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ सरकारकडून मदत देण्यात यावी यासाठी कंधार उपविभागीय कार्यालयावर ३ सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महिती दिली. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, माझी उपसभापती शफीउल्ला बेग, युवा नेते शिवराज धोंडगे, सुभाष मोरे, अशोक सोनवळे, राजू पाटील पांगरेकर, संतोष कागणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


मागील काही दिवसांपूर्वी कंधार व लोहा तालुक्यात मुसळधार व ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन खरिपातील मूग उडीद, सोयाबीन ज्वारी, तूर हळद कापूस ऊस या प्रमुख पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. नदी नाल्या काठच्या जमिनी खरडून गेल्या गुरे ढोरे शेकडोने वाहून गेले. अनेक गावांना पुराचा फटका बसला. गावागावात घरांची पडझड झाली अनेक घरात पुराचे पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या. एवढी मोठी अतिवृष्टी मागच्या 60- 70 वर्षाच्या काळामध्ये झाली नाही.


अशा बिकट प्रसंगात सरकार व सरकारात सामील असलेल्या लोकप्रतिनिधींनी तातडीने नुकसान भरपाईसाठी सरकारवर दबाव आणण्याऐवजी पाहणीचे सोंगडोग व फोटोसेशन करण्यात लोकप्रतिनिधी गुंग आहेत. हा सर्व प्रकार कीळसवाणा आहे. अशा बिकटप्रसंगी लोक प्रतिनिधींनी राष्ट्रीय व राज्य आपत्ती विभागाकडून आपापल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबई दिल्ली येथील दारात बसून नुकसान भरपाई आणण्याचे काम करावे.

शेतकरी व कष्टकरी यांच्या मोर्चातील मागण्या खालील प्रमाणे आहेत – शेतकऱ्यांना सरसगट प्रती एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, नदी,ओढ्या काठच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रती एकरी 1 लाख रुपये द्यावे, गुरे ,ढोरे वाहून गेलेल्या व घराची पडझड झालेल्या गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या काळातील व चालु वर्षातील पीक विमा तातडीने द्यावा. या प्रमुख मागण्या मोर्चेकरांच्या आहेत. या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी केले.


