हिमायतनगर (अनिल मादसवार) येथील पोलिसांकडून दररोज विना परवाना, विना लायसन्स, ट्रिपल सीट, बिना नंबर प्लेट, टुकार तसेच अल्पवयीन मुलांकडून चालविल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवित कडक कारवाई करण्यात येत आहे. गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत १० ते १५ वाहनांवर कारवाई करून १२ हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला. ही कारवाई ट्रॅफिक मशीनच्या सहाय्याने करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर काही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी आवाहन केले की, नागरिकांनी कोणतेही अनधिकृत वाहन चालवू नये. कायद्याची वचक राहणे आवश्यक असून उत्सव आनंदात व सुरक्षिततेत साजरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.


या कारवाईत हजेरी मेजर ट्राफिक जमादार नवाब खान पठाण, नागोराव सदावर्ते, होमगार्ड शंकर पाटील, किशन इंगळे, विष्णू इंगळे, पोतन्ना पिटलेवाड, गजानन ताडकुले, योगेश कदम, महिला होमगार्ड पवार, आडे, यनगुलवार, जमादार सुरकुंटे, तसेच राष्ट्रीय महामार्ग बारडचे विठ्ठल येडके, अमोल सातारे यांच्यासह पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. या मोहिमेमुळे शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित होत असून नागरिकांनीही जबाबदारीने नियम पाळावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




