Incessant rains cause : सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर मररोग ; प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी तातडीचा सल्ला

नांदेड, अनिल मादसवार| महाराष्ट्र तथा मराठवाडा विभागामध्ये कापूस लागवडीच्या भागात मागील आठ-दहा दिवसांपासून सततचा पाऊस पडत आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी झाली आहे. ज्या भागात पाऊस झाला आहे तिथल्या जमिनीवर बराच काळ पाणी साचलेले दिसत आहे. या परिस्थितीमुळे इतर खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे दिसत आहे. जास्त पाऊस झालेल्या शेतामध्ये दीर्घ काळापर्यंत पाणी साचून राहिल्यास त्याचा कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडानी मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत.

ही आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भाग्रस्त झाडे पूर्णत: वाळण्याची शक्यता असते. जमिनीत वाफसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये मुळाद्वारे अन्नद्रव्ये शोषण होत नाही. त्यामुळे झाडे कोमेजतात. पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्या नंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. सततचा व मोठा पाऊस आणि जमिनीत वाफसा नसणे व हवेतील आर्द्रता जास्त झाल्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. तसेच सततच्या पावसामुळे जमीनीमध्ये वाफसा परिस्थिती नसल्यामुळे कापसाच्या मुळामध्ये बुरशीची वाढ होऊन रसवाहिनी बंद होऊ शकतात. यालाच बुरशीजन्य मर असे म्हणतात. त्यामुळे कापूस पिकावर अशा प्रकारची आकस्मिक मर विकृती किंवा बुरशीजन्य मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करण्याचा सल्ला कापूस संशोधन केंद्र, नांदेड, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथून देण्यात आला आहे.

उपाययोजना :
पाण्याचा निचरा करावा:- शेतातील साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर काढावे.
आळवणी :- प्रमाण प्रति १०० लिटर पाणी कॉपर ऑक्सीक्लोराइड २५० ग्रॅम + २ किग्रॅ युरिया + १ किग्रॅ पांढरा पोटॅश (००:००:५०) १०० लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी फवारणी पंपाद्वारे किंवा डबा / बाटली / मगाद्वारे आळवणी (ड्रेन्चींग) करावी. प्रत्येक प्रादुर्भावग्रस्त झाडास जवळपास १०० मिली द्रावण पडेल याप्रमाणे आळे / बांगडी पद्धतीने आळवणी करून झाडाच्या बुंध्याजवळील माती व्यवस्थित दाबून घ्यावी. किंवा

पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) हे विद्राव्य खत ५०० ग्रॅम + कोबाल्ट क्लोराईड १ ग्रॅम यांचे १०० लिटर पाण्यात मिश्रण तयार करून द्रावणाची प्रति झाड १०० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेन्चींग) करावी. वरीलप्रमाणे द्रावणाची आळवणी म्हणजेच ड्रेंचींग करावी. फवारणी करू नये. आळवणी न करता ड्रेंचींग केल्यास फायदा होणार नाही.

खोडाजवळील माती दाबणे :- पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास झुकलेली झाडे मातीचा भर देऊन सरळ करावीत. कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.

जमिनीतील हवा खेळती ठेवणे :- शेतजमीन वाफश्यावर आल्यानंतर हलकी आंतरमशागत करून कापसाच्या मुळांना हवा खेळती ठेवावी म्हणजे झाडे लवकर पूर्ववत होतील. वरील सर्व उपाययोजना कापसाच्या शेतामध्ये झाडे मर होत असलेली दिसताच त्वरीत (२४ ते ४८ तासाच्या आत) कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. व्यवस्थापनास जेवढा उशीर होईल तेवढा फायदेशीर परिणाम कमी होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा – कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी, दूरध्वनी क्रमांक- 02452-229000व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button