हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीनाल्याच्या काठासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकाटात सापडला असून, यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी (Provide assistance of Rs 50,000 per hectare to farmers in Himayatnagar taluka who suffered losses due to heavy rains) अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारां मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे.



गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे नदी नाल्याच्या काठावरील शेती खरडून पिके वाहून गेली आहेत. इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या निसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये व नाले व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दिनांक २० ऑगस्ट बुधवारी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.



आजच्या स्थितीत इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असून, पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा दिवसापासून शेतीपिके पाण्यात असून, काही गावांमध्ये पाणी शिरल्याने ते ओसरण्याची स्थिती दिसत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा. अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




