नांदेड l श्रावण सोमवारच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र विमलेश्वर देवस्थान, मरळक येथे आमदार मा. बालाजीराव कल्याणकर व तहसीलदार मा. संजय वारकड यांच्या शुभहस्ते भगवान शंकराची महापूजा संपन्न झाली. यावेळी भाविकांनी हर हर महादेव, ॐ नमः शिवाय च्या जयघोषात महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसर भक्तिभावाने गाजून गेला.


श्रावण महिन्याच्या शुभारंभाचा पहिला सोमवार मरळक येथील श्री क्षेत्र विमलेश्वर देवस्थान येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व त्यांच्या पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर, तसेच नांदेडचे तहसीलदार व महादेव देवस्थानचे विश्वस्त संजय वारकड आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती वाडकर यांच्या सपत्नीक हस्ते भगवान महादेवाचा रुद्राभिषेक व महापूजा संपन्न झाली.


सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंत्रोच्चार, वादन आणि हरहर महादेवच्या घोषात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. गावकऱ्यांनी विशेष आकर्षक रांगोळ्या, तोरण व फुलांनी सजवलेले मंदिर, तसेच भाविकांसाठी केलेली प्रसाद व्यवस्था यामुळे पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


पूजनानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून गावकऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देवस्थान विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली व भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडुरे, तालुकाप्रमुख धनंजय पावडे, मरळकचे पोलिस पाटील शिवदास स्वामी, उमेश दिघे, विकास देशमुख,युवा सेनेचे गणेश शिंदे, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, तलाठी शिराळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक चेअरमन शंकरराव शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तातेराव शिंदे, शिवसेना नेते जयवंतराव कदम हे देखील विशेष उपस्थित होते. भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पराशर स्वामी यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. संपूर्ण गावाने एकत्र येऊन श्रद्धेचा आणि भक्तीचा हा सोहळा साजरा केला.


