नांदेड| विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या एका गाड्यावरून पाणीपुरी खाल्ल्याने ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. गुरुवारी सकाळी या विद्यार्थ्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील प्रकृती सुधारलेल्या विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून, इतर सर्वजण धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासन त्या पाणीपुरीवाल्याचा शोध घेत आहेत.


विष्णुपुरी परिसरात अनेक शैक्षणिक स्थळे आहेत, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची या ठिकाणी अवाक जावक होत असते. बुधवारी रात्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ग्रामीण तंत्रनिकेतन व एसजीजीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या एका पाणीपुरी सेंटरवर अनेक विद्यार्थ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. यातील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने मध्यरात्रीपासून उलटी, मळमळ आणि चक्कर असा त्रास सुरू झाला. गुरुवारी सकाळी या विद्यार्थ्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दुपारीपर्यंत सदर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. सायंकाळपर्यंत २५ विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृतीत सुधारणा होत असून, सर्वजण धोक्याबर असल्याचे सांगण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना पुढे आल्यानंतर विष्णुपुरी परिसरातील पाणीपुरी सेंटर येथील पाणीपुरी आणि इतर खाद्य पदार्थाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. दोषी आढल्यास संबधित दुकानदारावर गुन्हा दाखल होईल असे अन्न, औषधी विभागाचे सहायक आयुक्त चट्टे यांनी सांगीतले.




