नांदेड| नांदेड येथील गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित नांदेड ग्रंथोत्सवास ग्रंथसाहित्य व स्पर्धा परिक्षा ग्रंथ खरेदीस वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी दिली.


उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे 28 फेब्रु ते 1 मार्च 2025 पर्यंत दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवात वाचकांनी, ग्रंथप्रेमीनी ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


या ग्रंथोत्सवासाठी राज्यभरातून विविध प्रकाशनांची 20 स्टॉल लावण्यात आले होते. यात प्रमुख आकर्षण शासकीय प्रकाशन विक्री केंद्र होते. अधिकृत माहिती, शिवाय माफक दरात शासकीय प्रकाशने असल्यामुळे वाचकांनी गर्दी केली होती. जिल्हाभरातील अनुदानीत, विना अनुदानीत वाचनालयांनी मोठ्या प्रमाणावर ग्रंथ खरेदी केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच संशोधक व वाचक प्रेमीसाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठीचे ग्रंथ या आलेल्या स्टॉलमधून खरेदी करण्यात आली.


ग्रंथोत्सवात प्रामुख्याने निर्मल प्रकाशन, नांदेड, शांती पब्लिकेशन, पुणे, प्रगती बुक डेपो, हिंगोली, संदेश बुक डेपो, परभणी, प्रितम प्रकाशन,जळगाव, पूजा बुक स्टॉल, अबंड, आलवी बौध्द साहित्य भांडार, नांदेड, मांडणीकर बुक स्टॉल, सुशील बुक डेपो आदी प्रकाशकांनी विविध प्रकारचे ग्रंथसाहित्य व स्पर्धा परिक्षा ग्रंथ विक्रीस ठेवण्यात आले होते. ग्रंथोत्सवात मार्गदर्शन केलेले वक्ते सर्वश्री डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधर पटने, साहित्यिक श्रीकांत देशमुख, प्रा.भगवंत क्षिरसागर, पृथ्वीराज तौर, सुचिता खल्लाळ, शारदा कदम आदिनी शुभेच्छा देऊन तसेच प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांच्या आवडीनुसार मोठया प्रमाणात ग्रंथ खरेदी केली.

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र शासनाने ग्रंथालय चळवळ वाढीस लागावी तसेच नवसाहित्यिकांना प्रेात्साहन मिळावे, वाचन संस्कृती वाढावी यासाठी सन 2010 पासून राज्यभरात प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील संपूर्ण प्रकाशकांना यात सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात येते. वाचकांना एकाच ठिकाणी विविध प्रकाशकांची पुस्तके मिळत असल्यामूळे मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवसाहित्य, चित्रकला, उजळणी, बाराखडी, मुलांच्या गोष्टी, रंगकला, चित्रकला, अभ्यासाची पुस्तके, स्पर्धा परिक्षा व साहित्यपर पुस्तके यांची मोठया प्रमाणात विक्री झाल्याचे विविध प्रकाशकांनी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
बँक तपशील भरण्यासाठी टॅब उपलब्ध
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यानी http://hmas.mahait.org या पोर्टलवर बँक तपशील तात्काळ भरुन घ्यावा. जे विद्यार्थी बँक तपशील भरणार नाहीत ते लाभापासून वंचित राहिल्यास ते स्वत: जबाबदार राहतील. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरला नाही त्यांनी 15 मार्च 2025 पर्यत ऑनलाईन पोर्टलवर भरुन प्रिंट काढून महाविद्यालयातील समान संधी केंद्रात 7 दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.
दिनांक 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणार शैक्षणिक सत्र व नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीत येणाऱ्या अडचणी संदर्भात विविध विद्यार्थी संघटनाच्या मुदतवाढीच्या मागणी निवेदनाच्या अनुषंगाने आयुक्तालयाचे 4 मार्च 2025 च्या परिपत्रका नुसार स्वाधारसाठी पात्र विद्यार्थ्यांस अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापुर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यासाठी बँक तपशील भरण्याबाबतचा ऑनलाईन पोर्टलवर टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.


