नांदेड | शुक्रवारी गोकुळ नगर, व्हीआयपी रोड, कुसूम सभागृह परिसर व रेल्वे स्थानक परिसरात भरणारा आठवडी बाजार शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ऐवजी सोमवारी २४ फेब्रुवारीला भरणार आहे. कृपया शेतकरी ग्राहक व्यापारी या सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड शहरात शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारी भरणारा आठवडी बाजार हा सोमवार २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भरणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आदेश निर्गमीत केले आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास 3 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहेत. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम तसेच यशवंत कॉलेज मैदान या परिसरात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये ,यासाठी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश काढला आहे.
