नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुधवार दि. १९ रोजी सकाळी अकरा वाजता पौर्णिमोत्सव आणि शिवजयंती कार्यक्रम (Shiv Jayanti and Purnimotsav program at Shramner Training Center on 19) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून याच कार्यक्रमात अनेक उपक्रमांसह धम्मसारथी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार सोहळा व शहरातील गंगा काॅलनी, पंचशील नगर आणि श्रमसाफल्य नगर येथील बौद्ध उपासक उपासिकांकडून भव्य भोजनदान देण्यात येणार असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.


दरमहा पौर्णिमेनिमित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १९ तारखेला करण्यात येते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना भिख्खू संघ अभिवादन करणार आहे. तसेच धम्मसारथी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने होणार आहे. यात विठ्ठलराव लोणे, दामाजी रसाळे, शांताबाई धुताडे, शेषराव वाघमारे, कैलास सोनाळे, भीमराव नरवाडे, चंद्रकांत परघणे,अशोक हनवते ,विश्वनाथ वाघमारे, जयवर्धन भोसीकर, संजय खाडे, श्रीकांत हिवाळे, राहुल पुंडगे, शामराव जोगदंड, चंद्रभान हौजेकर, तुकाराम ढगे, एकनाथ दुधमल यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो व भिख्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.


दरम्यान, पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासूनच परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, ध्यानसाधना बोधीपुजा, पुरस्कार वितरण, भोजनदान, धम्मदेसना, सत्कार, बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम, दान पारमिता आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. आगामी काळात याच परिसरात श्रामणेर दीक्षाभूमी भव्य धम्मसंकल्प स्तूप उभारण्यात येणार आहे. याचे काम प्रगतीपथावर आहे. यात उपासकांच्या दानातूनच ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, विपश्यना केंद्र, भिक्षू निवास, भोजनव्यवस्था, धम्मदेसना सभागृहाची निर्मिती होणार आहे. तेव्हा सढळ हाताने दान करावे आणि पौर्णिमोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका, आंबेडकरी प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.




