किनवट, परमेश्वर पेशवे| आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व आदिवासी समाजांच्या मूलभूत गरजा अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी समाजाने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी जमातीत आरक्षण देण्याचा जीआर काढू असे आश्वासित केल्याने राज्यातील आदिवासी समाज आक्रमक झाला असून आदिवासी समाजाची आक्रमकता सर्व राज्यभरात पाहायला मिळत आहे. किनवट तालुक्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व आदिवासी समाजातील नेत्यांनी व आदिवासी नागरिकांनी आज एकत्र येत किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
हा रास्ता रोको आंदोलन तब्बल एक ते दीड तास सुरू असल्याने नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर व तेलंगणात जाणाऱ्या निर्मल मार्गावर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या आणि काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. हा रास्ता रोको सुरू असताना या रास्ता रोको आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी किनवट पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त ठेवला होता.
या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आदिवासी नेत्यांनी आपापली मते मांडली त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने धनगर समाजाला आदिवासी जमातीत समाविष्ट करू नये व पेसा कायदा अंतर्गत रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात अशा मागणीचे निवेदन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जाधव यांना देऊन आंदोलन मागे घेतले.
याप्रसंगी प्रा.विजय खुपसे,गोपीनाथ बुलबुले, सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी दत्ता धनवे. डॉक्टर सुभाष वानोळे, बालाजी भिसे, गणेश वागतकर,वसंत कुडमुते, शैलेश मेश्राम, रामा आडे, शेषेराव ढोले, तुकाराम तांबारे, शिवाजी भुरके, तुकाराम कोकाटे, माधव वाळके, सुरेश देशमुखे यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाला होता.