हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये येणाऱ्या बजरंग चौकातील रस्त्यावर थेट गटार नालीचे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही उपाययोजना केल्या जात नसल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांना साथीच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी चक्क गांधीगिरीचा मार्ग अवलंबुन थेट रस्त्यात झाडांचे फारोळे टाकून रस्ताच बंद केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेली शहरातील दुर्गंधी नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा उघड करणारी ठरत आहे. किमान आत्तातरी प्रशासनाने याची दखल घेऊन अनुचित घडण्या होण्यापूर्वी गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून कायम समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे.
सध्या शहरात गौरी गणपतीच्या सण उत्सवाचा पर्वकाळ सुरु आहे, असे असताना देखील शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिकडे तिकडे नाल्या तुंबल्या असून, मंदिर व मुख्य चौक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन मछरांच्या उत्पत्ती वाढली आहे. खरे पाहता नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने पावसाळ्या पूर्वी नाल्यांची सफाई करून रस्त्यावर गटारीचे पाणी येणार नाही नावावर उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र नेहमीप्रमाणे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने स्वच्छता विभागाचे पितळ उघडं पाडलं आहे. यामुळे आता शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
मागील सहा महिन्यापासून वारंवार बजरंग चौकातून पळसपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमा होणाऱ्या गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपंचायतीकडे केली गेली. याबाबत अनेकदा बातम्या देखील प्रकाशित झाल्या. मात्र कुंभकर्णी झोपेतील नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आत्ता तर गटारीचे पाणी गेली दोन तीन महिन्यापासून साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घाण पाण्यात उत्पन्न झालेल्या आळ्या शिरत आहेत. यामुळे नागरिक अक्षरशा वैतागले असून, डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया, ताप, सर्दी खोखला आदींसह पुन्हा कोरोना सारख्या आजाराची लागण होऊन रोगराई पसरत घराघरात रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
ज्या प्रकारे कर वसुलीत नगरपंचायत पुढाकार घेते तसाच पुढाकार घेऊन जनतेला सुरक्षित आरोग्याची हमी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि वॉर्ड क्रमांक एक मधील बजरंग चौक रस्त्यावर जमणाऱ्या गटारीच्या पाण्यासह शहरातील इतर वॉर्डातील सांडपाण्याचा बंदोबस्त करून कायम स्वरूपी विल्हेवाट लावून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते आहे. अन्यथा दुर्गंधी, अस्वच्छतेला वैतागलेले नागरिक नागरपंचायतीवर हल्लाबोल करण्याच्या बेतात आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनावर राहील असा इशाराही या भागातील युवकांनी दिला आहे.
शहरातील सर्वच वॉर्डातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर जमा होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्यांना दिसत नाही का..? हाच आहे का हिमायतनगर शहरातील कोट्यवधींचा विकास..? असा सवाल डासांची उत्पत्ती आणि पसरलेल्या दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरीकातून उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर शहरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात नगरपंचायत निधी खर्च करते मात्र नाल्याची सफाई नगरपंचायतीकडून नियमित केली जात नसल्याने नालीतील घाण आणि दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी थेट रस्त्यावर साचून राहत आहे. एखादे वाहन रस्त्याने गेल्यास हेच घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने शहर परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
पुन्हा हिमायतनगर नगरपंचायतीचा कारभार प्रभारींवर
मागील तीन वर्षांपासून हिमायतनगर शहराच्या नगरपंचायतीचा कारभार प्रभारी कधी प्रशासक आणि पुन्हा प्रभारींवर आला आहे. त्यामुळे शहराच्या प्रमुख स्वच्छता, पाणी आणि सार्वजनिक खांबावरील वीज पुरवठ्याच्या बाबतीत समस्या जैसे थेच आहेत. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष देऊन शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नेमून नागरिकांना दिला देण्यासाठी पाउले उचलावी अशी मागणी केली जात आहे.